Home Breaking News RTO शेजारील बांधकामामुळे रस्त्यावर चिखल; निसरड्या रस्त्यावर अनेक नागरिक घसरले, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

RTO शेजारील बांधकामामुळे रस्त्यावर चिखल; निसरड्या रस्त्यावर अनेक नागरिक घसरले, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

25
0
पुणे : RTO कार्यालयाशेजारी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पातील डंपर रस्त्यावर येताना मोठ्या प्रमाणात चिखल मुख्य रस्त्यावर आणत असल्याने परिसरातील रस्ता अत्यंत निसरडा झाला आहे. सोमवारी सकाळी अनेक दुचाकीस्वार आणि पादचारी घसरून पडल्याच्या घटना घडल्या. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाने ही त्यांची नियमित जबाबदारी नसतानाही तत्परता दाखवत सकाळी रस्ता धुवून स्वच्छ केला. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली आणि पुढील अपघात टळले.
मात्र, ज्या बांधकाम व्यावसायिकाची तसेच संबंधित पथ विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाची ही जबाबदारी आहे, त्यांच्याकडून आवश्यक ती कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी संबंधित विभागांनी तातडीने रस्त्याची नियमित स्वच्छता करावी, बांधकामस्थळावरून बाहेर पडणाऱ्या वाहनांची चाके धुण्याची व्यवस्था करावी आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.