पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरभर कचरा विलगीकरणाबाबत व्यापक जनजागृती अभियान सुरू केले आहे. नागरिकांनी घरातून निर्माण होणारा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य अशा चार प्रकारांमध्ये कचरा वेगळा करून महापालिकेच्या घंटागाडीला द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत महापालिकेचे कर्मचारी विविध प्रभागांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगत आहेत. तसेच परिसरांमध्ये जनजागृती कार्यक्रम, प्रबोधन मोहिमा आणि नागरिकांशी थेट संवाद साधून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ नुसार प्रत्येक नागरिकाने घरातील कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. कचरा स्रोतस्थळीच वेगळा केल्यास त्यावर प्रक्रिया करणे सुलभ होते, पुनर्वापराला चालना मिळते आणि लँडफिलवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. यामुळे शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनण्यास मदत होणार आहे.
महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांना महापालिकेच्या या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करत स्वच्छ पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येक घराचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्रोतस्थळी कचरा विलगीकरण हा शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा पाया असल्याचे नमूद केले, तर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी प्रत्येक प्रभागात जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.
महापालिकेच्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून, शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.