Home Breaking News पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंग पॉलिसीला वेग; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेची मोठी तयारी

पिंपरी-चिंचवडमध्ये पार्किंग पॉलिसीला वेग; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेची मोठी तयारी

32
0
पिंपरी, दि. ४ ऑगस्ट २०२६ :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार्किंग पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत शहरातील विद्यमान पार्किंग व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेण्यात आला असून भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन अधिक सक्षम, व्यवहार्य आणि नागरिकांना दिलासा देणारी पार्किंग व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात आला.
बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर तसेच संबंधित अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.
यावेळी पूर्वीच्या पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीत आलेल्या अडचणी, त्रुटी आणि त्यावरील उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. शहरातील वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे प्रमुख रस्त्यांवर निर्माण होणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पार्किंग व्यवस्थेचे पुनर्नियोजन आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग रोखणे, व्यापारी संकुले, सार्वजनिक ठिकाणे आणि प्रमुख चौकांमध्ये नियोजनबद्ध पार्किंग सुविधा उभारणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्ट पार्किंग प्रणाली विकसित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे आतापर्यंतच्या कामाचा आढावा मांडत शहरातील उपलब्ध पार्किंग जागा, भविष्यातील गरजा आणि सुधारणा प्रस्ताव सादर केले.
महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता प्रभावी पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर पार्किंग सुविधा उपलब्ध करून देतानाच वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांचा कार्यक्षम वापर करणे आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासाला गती देणे हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
महापालिकेच्या या उपक्रमामुळे भविष्यात शहरातील वाहतूक व्यवस्थेत अधिक शिस्त निर्माण होण्यास मदत होणार असून नागरिकांनाही दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.