Home Breaking News ‘ऑक्सिरीच करंडक’ महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेवर व्हेरॉक वेंगसकर ॲकॅडमीचे निर्विवाद वर्चस्व; अंतिम...

‘ऑक्सिरीच करंडक’ महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेवर व्हेरॉक वेंगसकर ॲकॅडमीचे निर्विवाद वर्चस्व; अंतिम सामन्यात क्रिक फिटनेटचा ९२ धावांनी धुव्वा!

29
0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘ऑक्सिरीच करंडक’ महिला आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमीने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. रावेत येथील चॅम्पियन्स एरिना मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात व्हेरॉक संघाने क्रिक फिटनेट ॲकॅडमीचा तब्बल ९२ धावांनी पराभव केला. निकीता सिंगची आक्रमक फलंदाजी आणि सृष्टी यादवच्या भेदक गोलंदाजीमुळे व्हेरॉक संघाने स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसकर ॲकॅडमीने निर्धारित २० षटकांत चार गडी गमावून १६३ धावा उभारल्या. निकीता सिंगने अवघ्या ४१ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६८ धावांची शानदार खेळी केली. मेहक मुल्लाने ४८ चेंडूंत ५१ धावा करत संघाच्या धावसंख्येला भक्कम आधार दिला.
१६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्रिक फिटनेट ॲकॅडमीचा संघ १३.२ षटकांत अवघ्या ७१ धावांवर गारद झाला. नाव्या दुबे (२२) आणि राशी व्यास (२१) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्हेरॉकच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली नाही. सृष्टी यादवने १५ धावांत चार बळी घेतले, तर पर्णवी गाढवेने तीन आणि आराध्या सिंगने दोन बळी मिळवले. अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार निकीता सिंग हिला प्रदान करण्यात आला.
स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमीला तृतीय क्रमांक
तृतीय क्रमांकाच्या लढतीत स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमीने मॅव्हरीक्स ॲकॅडमीचा पाच गडी राखून पराभव केला. मॅव्हरीक्सने प्रथम फलंदाजी करत १७ षटकांत ९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात स्कोअर स्पोर्ट्सने १३.२ षटकांत ९७ धावा करत विजय मिळवला. समीक्ष्या पवारने नाबाद ४८ धावा, तर आर्या चिखलीकरने नाबाद २७ धावांचे योगदान दिले. या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार आर्या चिखलीकर हिला मिळाला.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी रणजीपटू मिलिंद कुलकर्णी आणि बांधकाम व्यावसायिक केतुल सोनिग्रा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, सहसचिव डॉ. दिलीप सिंह मोहिते, खजिनदार संजय शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विजेत्या व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट ॲकॅडमीला १५ हजार रुपये व करंडक, उपविजेत्या क्रिक फिटनेट ॲकॅडमीला १० हजार रुपये व करंडक, तर तृतीय क्रमांकाच्या स्कोअर स्पोर्ट्स ॲकॅडमीला पाच हजार रुपये व करंडक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी रणजीपटू मिलिंद कुलकर्णी यांनी पालकांना मार्गदर्शन करताना मुलांच्या नैसर्गिक खेळाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. खेळाडूंवर अनावश्यक मानसिक दबाव आणू नये, त्यांच्या खेळात हस्तक्षेप टाळावा आणि प्रशिक्षकांशी योग्य समन्वय ठेवावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
महिला क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा शहरातील महिला क्रिकेटच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळत असून भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळणार आहे.