नांदेड : खासगी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या अवघ्या सात हजार रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी कथित छळ आणि धमक्यांचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील ४० वर्षीय शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरातील खालसा फायनान्सच्या कार्यालयात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी फायनान्स कर्मचाऱ्यांवर मारहाण आणि धमकावल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शिंदे यांनी संबंधित फायनान्स कंपनीकडून सात हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र, परतफेडीच्या तगाद्यादरम्यान मूळ रकमेच्या तुलनेत मोठी रक्कम मागितली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सात हजार रुपयांचे कर्ज महिन्याभरात ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे शिंदे यांच्या मुलीने सांगितले.
कुटुंबीयांच्या आरोपानुसार, तीन दिवसांपूर्वी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत शिंदे यांना गावातून घेऊन जात कार्यालयात डांबून ठेवले होते. त्यांना मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह याच कार्यालयात आढळल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
मुलीने सांगितला धमकीचा घटनाक्रम
मृत शेतकऱ्याच्या मुलीने माध्यमांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली. रात्री फोनवर एका महिलेने पैसे तातडीने पाठवण्याची मागणी केली होती. पैसे न पाठवल्यास चंद्रकांत यांना मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तिने केला. ‘आम्ही काहीही करू शकतो, पैसे भरावेच लागतील,’ अशा शब्दांत धमकावण्यात आल्याचेही तिने सांगितले.
यापूर्वी गावातील दोन व्यक्तींना फायनान्स कर्मचाऱ्यांनी नेले होते आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिले होते. त्यामुळे यावेळीही वडिलांना सोडून देतील, अशी कुटुंबीयांना अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही, असे मुलीने सांगितले. यासंदर्भातील नोंदी असलेली डायरी घरी असल्याची माहितीही तिने दिली.
आईकडून घातपाताचा संशय
चंद्रकांत शिंदे यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता असल्याचा संशय त्यांच्या आईने व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणातील नेमके सत्य तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.
अल्प रकमेच्या कर्जाच्या वसुलीसाठी धमकी, दबाव किंवा बेकायदेशीर पद्धतींचा वापर होत असल्यास तो गंभीर चिंतेचा विषय आहे. या प्रकरणात संबंधित फायनान्स कंपनीची भूमिका, कर्जाच्या व्यवहारातील नोंदी आणि मृत्यूचे नेमके कारण यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांकडून होत आहे.




