Home Breaking News तीन महत्त्वाच्या विकासकामांना महापालिकेचा हिरवा कंदील; नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांच्या पाठपुराव्याला...

तीन महत्त्वाच्या विकासकामांना महापालिकेचा हिरवा कंदील; नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांच्या पाठपुराव्याला यश!

17
0
निगडी (प्रतिनिधी) दिनांक १८ नोव्हेंबर २०२६:- प्रभाग क्रमांक १३ मधील महत्त्वाच्या नागरी सुविधांच्या विकासासाठी नगरसेवक प्रा. उत्तम प्रकाश केंदळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण मागणी आणि पाठपुराव्याला यश मिळाले असून त्यांच्या प्रयत्नांतून निगडी परिसरातील तीन महत्त्वाच्या विकासकामांसाठी स्थायी समितीने सल्लागार नियुक्तीच्या प्रक्रियेला मंजुरी(दि.१८) दिली आहे. यामध्ये अंकुश चौक ते त्रिवेणीनगर चौक (स्पाईन रस्ता) येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ग्रेडसेपरेटर अथवा उड्डाणपूल उभारणे, निगडी स्मशानभूमीचा दुसरा टप्पा विकसित करणे आणि यमुनानगर येथील अमृतानंदमयी मठाकडे जाणाऱ्या रस्त्याची व इतर मुख्य रस्त्याची सुधारणा करणे या कामांचा समावेश आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या सहकार्यामुळेच विकास कामांना चालना मिळत आहे.तसेच नगरसेविका अर्चनाताई करांडे आणि नगरसेवक बापू घोलप यांच्या सहकार्याने या विकासकामांसाठी केंदळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
स्पाईन रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्याची आशा
अंकुश चौक ते त्रिवेणीनगर चौक या स्पाईन रस्त्यावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या मार्गावर ग्रेडसेपरेटर अथवा उड्डाणपूल उभारण्याची मागणी केंदळे यांच्याकडून करण्यात आली होती. यासाठी १५ जून २०१९ रोजी मागणीपत्र देण्यात आले होते. त्यानंतर १९ ऑगस्ट २०१९ रोजी महापालिकेकडून पत्रव्यवहार झाला. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत १६ फेब्रुवारी २०२६ रोजी स्मरणपत्र देण्यात आले. अखेर या कामासाठी सल्लागार नियुक्तीला महापालिकेने मंजुरी दिल्याने वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
निगडी स्मशानभूमीच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकासाला चालना
निगडी स्मशानभूमीच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात २०१७ ते २०२२ या कालावधीत विविध कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये नवीन विद्युत दाहिनी, हवा प्रदूषण नियंत्रण युनिट, दुसरी विद्युत दाहिनी तसेच गॅस व विद्युत दाहिनी युनिट अशा सुविधांचा समावेश आहे. मात्र, वाढत्या गरजा लक्षात घेता स्मशानभूमीच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांची आवश्यकता होती.यासाठी २४ नोव्हेंबर २०२२ रोजी मागणीपत्र देण्यात आले होते. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०२६ रोजी स्मरणपत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला. या कामासाठी महापालिकेचा ठराव आणि तरतूद वर्गीकरणाची प्रक्रिया २७ जुलै २०२६ रोजी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांसाठी सल्लागार नियुक्तीला मंजुरी मिळाल्याने या प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा केंदळे यांनी व्यक्त केली.
अमृतानंदमयी मठाकडे व प्रभागातील जाणाऱ्या इतर रस्त्याच्या सुधारणेचा मार्ग मोकळा
निगडी यमुनानगर येथील अमृतानंदमयी मठाकडे जाणाऱ्या रस्त्याची व प्रभागातील इतर मुख्य रस्त्याची सुधारणा करण्याची मागणीही प्रा. उत्तम केंदळे यांनी प्रशासकीय कालावधीपासून सातत्याने लावून धरली होती. या कामासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून तसेच नगरसेविका अर्चनाताई करांडे आणि नगरसेवक बापू घोलप यांच्या सहकार्याने या प्रकल्पाच्या कामासाठी सल्लागार नियुक्तीला मंजुरी मिळाली आहे.
या तिन्ही कामांसाठी मागणीपत्रे, स्मरणपत्रे आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करत प्रा. उत्तम केंदळे यांनी नागरी सुविधांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. सल्लागार नियुक्तीला मिळालेली मंजुरी ही विकासकामांच्या दिशेने महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया असली, तरी प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊन ती वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे असे मत नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यांनी व्यक्त केले.