Home Breaking News औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडची आता जागतिक क्रीडा नकाशावरही छाप; १०...

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडची आता जागतिक क्रीडा नकाशावरही छाप; १० जानेवारी २०२७ रोजी ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’चे आयोजन…

26
0
पिंपरी, दि. १९ नोव्हेंबर २०२६ : – औद्योगिक नगरी म्हणून देशभरात ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला आता क्रीडा क्षेत्रातही जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने येत्या १० जानेवारी २०२७ रोजी ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे. या मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन, २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा विविध गटांचा समावेश असणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेसविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. 
 
मॅरेथॉनच्या आयोजनासाठी अशा स्पर्धांचा अनुभव असलेल्या संस्थेची मदत घेतली जाणार असून, स्पर्धेची नोंदणी आणि अन्य व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात येणार आहे. तसेच ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’चा समावेश जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये व्हावा, यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
      महापौर रवि लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आजवर औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीमुळे देशभरात निर्माण झाली आहे. आता क्रीडा क्षेत्रातही शहराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉनच्या माध्यमातून शहरातील तरुणाई आणि नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा मिळेल. देश-विदेशातील धावपटूंना आकर्षित करणारी ही स्पर्धा शहराच्या लौकिकात भर घालणारी ठरेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.” 
    
“पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉनचे आयोजन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियोजनानुसार करण्यात येणार आहे. ४२, २१, १० आणि ५ किलोमीटर अशा विविध गटांमुळे सर्व वयोगटांतील धावपटूंना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचा जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये समावेश व्हावा, यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील. शहरात क्रीडा संस्कृती रुजविणे, नागरिकांचे आरोग्य उत्तम राखणे आणि पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ओळख मिळवून देणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.” असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले.
      या कार्यक्रमाचे अनुषंगाने महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांची पत्रकार परिषद आज घेण्यात आली होती,या परिषदेस उपमहापौर शर्मिला बाबर,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे,क्रीडा समिती सभापती कैलास कुटे,क्रिडा समिती सदस्य योगेश लांडगे,धर्मपाल तंतरपाळे,शाम जगताप,तानाजी बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम,उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.