पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक स्थिर, सुरक्षित आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी आमदार अमितजी गोरखे यांच्या पुढाकारातून महावितरण प्रशासनाने विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांना गती दिली आहे. निगडी-प्राधिकरणासह आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर तसेच संपूर्ण पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत.
वारंवार होणारे फिडर बिघाड, जुन्या केबल, DTC यार्डमधील समस्या, फिडर पिलरची खराब अवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लागणारा वेळ यावर उपाय करण्यासाठी महावितरण अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामांनाही गती देण्यात आली आहे.
निगडी शाखेतील वीज व्यवस्था मजबूत
निगडी शाखेअंतर्गत २२ के.व्ही. प्रकाशगड फिडरचे संपूर्ण लाईन मेंटेनन्स करण्यात आले आहे. त्यामुळे फिडरवरील तांत्रिक बिघाडांची शक्यता कमी करण्यास मदत होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत बिघाड झाल्यास तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी २ GOD बसविण्यात आले आहेत. तसेच ३० DTC यार्डमधील झाडांची छाटणी आणि गवत साफसफाईची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे वीज वितरण यंत्रणेच्या सुरक्षिततेबरोबरच देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिक सुलभता मिळणार आहे.
प्राधिकरण शाखेतही मोठ्या प्रमाणावर कामे
प्राधिकरण शाखेअंतर्गत २२ के.व्ही. टेल्को, २२ के.व्ही. D-३ आणि २२ के.व्ही. रसटन फिडरचे मेंटेनन्स पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय चार ठिकाणी GOD चे मेंटेनन्स करण्यात आले असून तीन नवीन GOD बसविण्यात आले आहेत. खराब झालेले १० फिडर पिलर बदलून नवीन पिलर बसविण्यात आले आहेत. तसेच १३ ठिकाणी बॉक्स मेंटेनन्स आणि १४ ठिकाणी DTC यार्डची साफसफाई करण्यात आली आहे. या कामांमुळे वीज वितरण यंत्रणेतील तांत्रिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.
जुन्या केबलला निरोप; नवीन LT केबल टाकली
गुरुदत्त मंदिर, होंडा शोरूम आणि गोदावरी शाळा या महत्त्वाच्या ठिकाणी जुन्या केबल काढून नवीन LT केबल टाकण्यात आल्या आहेत. जुन्या केबलमुळे होणारे बिघाड आणि वीजपुरवठ्यातील व्यत्यय कमी करण्याच्या दृष्टीने ही उपाययोजना महत्त्वाची मानली जात आहे. नवीन केबलमुळे संबंधित भागातील वीजपुरवठ्याची स्थिरता आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे.
D-३ फिडरसाठी पर्यायी वीजपुरवठ्याची सुविधा
या संपूर्ण कामांमधील महत्त्वाची बाब म्हणजे २२ के.व्ही. D-३ फिडरचा वीजपुरवठा २२ के.व्ही. टेल्को फिडरवरून बॅक फिड करता यावा, यासाठी तब्बल ७० मीटर नवीन २२ के.व्ही. केबल टाकण्यात आली आहे. यामुळे भविष्यात D-३ फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी फिडरच्या माध्यमातून वीजपुरवठा तातडीने सुरू करता येणार आहे. परिणामी नागरिकांना दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहण्याचा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे.
मनुष्यबळ आणि साधनसामग्रीत वाढ
वीज वितरण व्यवस्थेच्या देखभालीसाठी महावितरण कर्मचाऱ्यांना आवश्यक T&P साधनसामग्री, HT आणि LT केबल उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त मेंटेनन्स एजन्सी उपलब्ध करून देण्यात आल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास मदत होणार आहे. निगडी शाखेतील सहाय्यक अभियंता श्रीमती पवार यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी श्री. महादेव मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निगडी शाखेसाठी स्वतंत्र शिडी गाडी उपलब्ध करून देण्यास मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली असून, लवकरच ही सुविधा कार्यान्वित होणार आहे.
वीज तक्रारींसाठी अधिकाऱ्यांचा थेट समन्वय
नागरिकांच्या वीजविषयक तक्रारी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यावर जलद कार्यवाही व्हावी, यासाठी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांचा स्वतंत्र व्हॉट्सॲप समन्वय ग्रुप तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समन्वयामध्ये अति. कार्यकारी अभियंता श्री. महाजन, शाखा अभियंता निगडी श्री. मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आकुर्डी श्री. शिर्के, शाखा अभियंता चिंचवड सौ. सोबळी शिंदे आणि कार्यकारी अभियंता भोसरी श्री. लहाने यांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यामुळे नागरिकांच्या तक्रारींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत वेळ न दवडता पोहोचविणे आणि दुरुस्तीच्या कामाला गती देणे शक्य होणार आहे.
निगडी-प्राधिकरणापुरते काम मर्यादित नाही
वीजपुरवठा सुधारण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना केवळ निगडी आणि प्राधिकरण परिसरापुरत्या मर्यादित नसून आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर आणि संपूर्ण पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीजविषयक समस्यांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी, स्थानिक पातळीवरील तांत्रिक अडचणी आणि भविष्यातील वीज मागणी लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
“तात्पुरत्या दुरुस्तीपेक्षा कायमस्वरूपी सक्षम व्यवस्था उभारण्यावर भर”
आमदार अमितजी गोरखे म्हणाले, “नागरिकांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे ही मूलभूत गरज आहे. त्यामुळे केवळ बिघाड झाल्यानंतर दुरुस्ती करण्याऐवजी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यावर आमचा भर आहे.”
“निगडी-प्राधिकरणासह आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, शाहूनगर, संभाजीनगर आणि संपूर्ण पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना वीजपुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी महावितरण प्रशासनासोबत समन्वयाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविणे ही आमची जबाबदारी असून, त्यासाठी सातत्याने काम करत राहू,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह होण्याची अपेक्षा
फिडर मेंटेनन्स, नवीन GOD आणि फिडर पिलर, जुन्या केबलऐवजी नवीन LT केबल, DTC यार्डची स्वच्छता, अतिरिक्त मनुष्यबळ व साधनसामग्री तसेच पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण प्रणाली अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
विशेषतः तांत्रिक बिघाडाच्या काळात पर्यायी फिडर उपलब्ध असल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लागणारा कालावधी कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीजखंडित होण्याच्या समस्येपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.