Home Breaking News २० वर्षांपासून विकास रखडला; फसवणूक व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, व्यावसायिकांविरोधात गुन्हा...

२० वर्षांपासून विकास रखडला; फसवणूक व जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

22
0
पिंपरी | प्रतिनिधी :
पिंपरी येथील नमस्कार हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत विनोद अनंता धुमाळ यांनी त्यांच्या कुटुंबाची तब्बल २० वर्षांपासून फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित व्यावसायिकांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दापोडी पोलिसांकडे केली आहे. विकास करार करूनही ना विकासकाम झाले, ना करारानुसार मोबदला मिळाला, असा आरोप धुमाळ यांनी केला.
धुमाळ यांनी सांगितले की, २२ डिसेंबर २००६ रोजी कायदेशीर विकास करार आणि कुलमुखत्यारपत्राद्वारे मिळकत विकासासाठी देण्यात आली होती. या करारानुसार विकासकाने चार वर्षांच्या आत व्यावसायिक इमारतीतील तळमजल्यावर एक दुकान आणि सुमारे ६५० चौ. फूट सुपर बिल्ट-अप फ्लॅट देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, कराराला जवळपास दोन दशके उलटूनही विकासकामाला सुरुवात झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
धुमाळ यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा पाठपुरावा करूनही संबंधितांकडून केवळ आश्वासने मिळाली. मोबदला किंवा मूळ मिळकत परत देण्याची मागणी केल्यानंतर मात्र धमक्या देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. शिवीगाळ, कॉलर पकडून मारहाणीची धमकी, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भाषा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
याप्रकरणी संबंधित व्यावसायिक आणि मध्यस्थाविरोधात दापोडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही धुमाळ यांनी केला. त्यांनी पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
धुमाळ यांनी स्पष्ट केले की, “माझी कोणाशीही वैयक्तिक शत्रुत्वाची भावना नाही. मात्र माझ्या कुटुंबाची फसवणूक झाली असून आम्हाला न्याय मिळावा, हीच आमची अपेक्षा आहे.” व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे, कराराच्या प्रती आणि तक्रारींची माहिती पोलिसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रकरणी न्याय मिळाला नाही तर वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, राज्य शासन यांच्याकडे दाद मागण्यात येईल तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांवर संबंधित व्यावसायिकांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांचा तपास सुरू असून चौकशीनंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.