पिंपरी, दि. ३ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराचा आगामी २० वर्षांचा विकास अधिक नियोजनबद्ध, शाश्वत आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखडा २०२६ संदर्भात नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवून सुनावणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि हरकतींचा विचार करून अंतिम विकास आराखडा अधिक प्रभावी व सर्वसमावेशक करण्यात येणार आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२५ रोजी प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून, त्यावरील हरकती व सूचनांच्या सुनावण्या ऑगस्ट ते डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहेत. या प्रक्रियेत नागरिकांनी रचनात्मक सूचना मांडून शहराच्या भविष्यातील विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थापना ११ ऑक्टोबर १९८२ रोजी झाली. त्यावेळी शहराचे क्षेत्रफळ ८६ चौ.कि.मी. होते, तर आज ते सुमारे १७६ चौ.कि.मी.पर्यंत वाढले आहे. वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरण लक्षात घेता भविष्यातील विकासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक बनले आहे.
प्रारूप विकास आराखड्यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक, सार्वजनिक आणि हरित क्षेत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय रस्ते, जलपुरवठा, जलनिस्सारण, सार्वजनिक वाहतूक, पदपथ, सायकल ट्रॅक, उद्याने, क्रीडांगणे, आरोग्य सुविधा, आपत्ती व्यवस्थापनासाठी जागा आणि मनोरंजनाच्या सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे.
महापालिकेच्या मते, या विकास आराखड्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणे, पर्यावरण संवर्धन, पूरप्रवण भागांचे नियोजन, रोजगारनिर्मिती, औद्योगिक वाढ आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे विकास आराखडा हा केवळ आरक्षणाचा दस्तऐवज नसून शहराच्या भविष्यातील प्रगतीचा महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरणार आहे.
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, विकास आराखड्याचा अभ्यास करून आपल्या हरकती व सूचना निश्चित कालावधीत सादर कराव्यात. नागरिकांचा सहभाग जितका अधिक असेल, तितका शहराचा विकास अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी होईल.