पिंपरी-चिंचवड : वाकड फाटा परिसरातील दत्त मंदिर रस्त्यावर असलेल्या दिल्ली 6 बिर्याणी हॉटेलमध्ये रविवारी रात्री भीषण आग लागून १९ वर्षीय युवकाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील गॅस सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर जोडण्याचे काम सुरू असताना अचानक गॅस गळती होऊन आग आणि धुराचा मोठा भडका उडाला. काही क्षणांतच संपूर्ण हॉटेल धुराने भरून गेल्याने कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, हॉटेलमध्ये अडकलेल्या मोहम्मद सहजद (वय १९) या युवकाचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सिलेंडर बसवण्यासाठी आलेला गॅस एजन्सीचा कर्मचारी घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली असून, त्याचा पोलीसांकडून शोध सुरू आहे. हॉटेलमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, गॅस जोडणीदरम्यान निष्काळजीपणा झाला का आणि दुर्घटनेस नेमके कोण जबाबदार आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या दुर्घटनेनंतर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यव्यवसायिक आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा, गॅस हाताळणी आणि आपत्कालीन उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.