पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या प्रलंबित नागरी समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. रस्ते, वाहतूक, अतिक्रमण, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन या प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा करत प्रशासनाला महिनाभराची स्पष्ट डेडलाईन देण्यात आली.
बैठकीस क-प्रभाग अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे, ई-प्रभाग अध्यक्षा अर्चना सस्ते, फ-प्रभाग अध्यक्षा शिवानी नरळे, ल-प्रभाग अध्यक्षा रेखा देवकर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे तसेच वाहतूक पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त निलेश देशमुख आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खड्डेमुक्त रस्ते व पदपथ, वाहतूक कोंडीवर तातडीचे उपाय, बीआरटी आणि विकास आराखडा (DP) रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम, नो पार्किंग नियमांची कठोर अंमलबजावणी, पीएमपीएमएल सेवा अधिक सक्षम करणे तसेच मोशी दुर्घटनेनंतर कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचे नियोजन या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय अधिकारी केवळ कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करतील, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली. “प्रशासनाच्या बैठका नव्हे, तर प्रत्यक्ष कामे नागरिकांना दिसली पाहिजेत,” असा स्पष्ट संदेश बैठकीत देण्यात आला.
शहरातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ, वाहतूक कोंडीमुक्त आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने वेळेत कामे पूर्ण करावीत, अन्यथा दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला. या निर्णयांमुळे भोसरीसह पिंपरी-चिंचवड शहरातील मूलभूत नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.