Home Breaking News पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा ‘500 Emails to FDA’ एल्गार; निकृष्ट अन्न, अस्वच्छता आणि...

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा ‘500 Emails to FDA’ एल्गार; निकृष्ट अन्न, अस्वच्छता आणि प्रशासनाविरोधात संताप

28
0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) परिसरातील मेस आणि कँटीनमधील कथित निकृष्ट अन्न, अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापनाविरोधात विद्यार्थ्यांचा संताप आता उफाळून आला आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने ‘500 Emails to FDA’ या विशेष मोहिमेची घोषणा केली असून, कॅम्पसमधील अन्नाच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) सामूहिक तक्रारी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
या मोहिमेअंतर्गत किमान 500 विद्यार्थी FDA ला ई-मेलद्वारे अधिकृत तक्रारी पाठविणार असून विद्यापीठातील मेस आणि कँटीनमधील कथित अनियमितता, अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन याकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून वारंवार तक्रारी करूनही विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने हा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव यांनी सांगितले की, “विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विविध मेस आणि कँटीनमधून सतत तक्रारी समोर येत आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे आता FDA च्या हस्तक्षेपाची मागणी केली जात आहे.”
विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांनुसार, गेल्या महिनाभरात मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात अळ्या, किडे, डास, झुरळे आणि इतर घातक घटक आढळल्याच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत. 10 जून रोजी रात्रीच्या जेवणात भाजीमध्ये कीटक आढळल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. याशिवाय मागील 20 ते 25 दिवसांत अन्नातील दूषित घटकांबाबत अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, केवळ अन्नाच्या गुणवत्तेचाच नव्हे तर मेस व्यवस्थापनातील शिस्तीचाही प्रश्न समोर आला आहे. 15 एप्रिल रोजी G-8 मेसमध्ये काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी आणि गोंधळ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सुरक्षा विभागाला माहिती दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली होती. तसेच 14 जून रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास रिफेक्टरी मेसमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या कथित मारामारीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि नाराजी वाढली. अशा घटना विद्यापीठातील भोजन व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अभिषेक शेलकर यांनी आरोप केला की, मेस आणि कँटीनमधील गैरप्रकारांबाबत अनेकदा तक्रारी करूनही डायनिंग हॉल आणि व्हिजिलन्स कंट्रोल कमिटीने प्रभावी बैठका घेतलेल्या नाहीत. तसेच संबंधित कंत्राटदारांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे.
विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना निवेदन देण्याची तयारी केली असून त्यामध्ये डायनिंग हॉल आणि व्हिजिलन्स कंट्रोल कमिटी बरखास्त करणे, मागील महिनाभरातील सर्व तक्रारींवर झालेल्या कारवाईचा अहवाल जाहीर करणे, मेस व्यवस्थापनासाठी अधिक कडक निरीक्षण यंत्रणा उभारणे आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, मागील एका वर्षातील सर्व तक्रारी, पुरावे आणि कथित नियमभंगाच्या घटनांची माहिती संकलित करून ती FDA कडे सादर करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे ही मोहीम विद्यापीठ प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे पुणे विद्यापीठातील भोजन व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून FDA आणि विद्यापीठ प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बातमी लिहीपर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती.