पिंपरी : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारीला वेग दिला असून शहरातील संभाव्य पूरस्थिती, पाणी साचण्याच्या समस्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध नाले, नदीपात्रे आणि सखल भागांची प्रत्यक्ष पाहणी करत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले.
शिक्षक कॉलनी, पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्राची पाहणी करताना आयुक्तांनी नदी आणि नाल्यांच्या वहनक्षमतेची सविस्तर माहिती घेतली. अतिवृष्टीच्या काळात पाणीपातळी वाढण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची नोंद घेऊन तेथे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले. पूराचा धोका असलेल्या भागांमध्ये अतिरिक्त यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करणे अत्यावश्यक आहे. नाल्यांमधील गाळ, कचरा आणि अडथळे तातडीने हटविण्यात यावेत तसेच पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण करण्यात याव्यात. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांबाबतही चर्चा करण्यात आली. नदीपात्र आणि नाल्यांमध्ये अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत कामांना प्रशासनाकडून अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकेच्या विविध विभागांकडून शहरभरातील नालेसफाई, गटार स्वच्छता, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक दुरुस्ती कामे, पंपिंग यंत्रणांची तपासणी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा मजबूत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सखल भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी विशेष कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, योगेश फल्ले, अंकुश झिटे, शांताराम माने तसेच कार्यकारी अभियंते, सह अभियंते आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने महापालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. पावसाळ्यातील संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्व विभागांना पूर्वतयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शहरातील प्रत्येक भागात आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिकेच्या या सक्रिय तयारीमुळे यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती, वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, पावसाळ्यापूर्वी परिसर स्वच्छ ठेवावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.