Home Breaking News धनकवडीत २५.९० लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; फॉरेक्स कंपनीतील कर्मचाऱ्यासह ६ जण अटकेत, चोरीचा...

धनकवडीत २५.९० लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; फॉरेक्स कंपनीतील कर्मचाऱ्यासह ६ जण अटकेत, चोरीचा ऐवज जप्त

21
0
पुणे : धनकवडी परिसरात घडलेल्या तब्बल २५ लाख ९० हजार रुपयांच्या रोख रक्कम आणि परकीय चलन लुटीच्या प्रकरणाचा सहकारनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत मोठे यश मिळवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दरोड्याचा सूत्रधार तक्रारदाराच्या फॉरेक्स कंपनीतच काम करणारा कर्मचारी असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह सहा आरोपींना अटक केली असून सुमारे २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही घटना २५ मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास संभाजीनगर येथील धनकवडी पोस्ट ऑफिस रोडवरील दुर्वांकूर कार्यालयाजवळ घडली होती. तक्रारदार अनिकेत मनक कदम (वय ४७) हे गुलटेकडी येथे आर्या फॉरेक्स प्रायव्हेट लिमिटेड या परकीय चलन विनिमय व्यवसायाचे संचालन करतात. ते कार्यालयाकडे जात असताना त्यांच्या जवळ मोठी रोकड आणि परकीय चलन असलेली बॅग होती.
याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. आरोपींनी त्यांच्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर संशयित स्प्रे फवारला व त्यानंतर जबरदस्तीने रोकड आणि परकीय चलन असलेली बॅग हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. या बॅगेत २५ लाख रुपये रोख, १,१०० मलेशियन रिंगिट आणि २,५०० यूएई दिरहम होते. या सर्व मालमत्तेची एकूण किंमत २५.९० लाख रुपये इतकी होती. घटनेनंतर सहकारनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत दरोडा आणि सामूहिक कट रचल्याचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान आंबेगाव पठार परिसरात एक संशयित व्यक्ती मोठ्या प्रमाणात रोकड आणि परकीय चलनासह फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून चैतन्य साठे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संपूर्ण कटाचा पर्दाफाश केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त (झोन २) मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य साठे याने चौकशीत करण कोंढाळकर, यश कोंढाळकर, जुनैद शेख आणि इतर साथीदारांसह हा दरोडा टाकल्याची कबुली दिली. या कटामागे तक्रारदाराच्या कार्यालयात काम करणारा युवराज वैराट आणि त्याचा मित्र ऋतुराज गोरे हे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. तपासात असेही निष्पन्न झाले की, कार्यालयातील रोकड कधी आणि कुठे नेली जाते याची गोपनीय माहिती आरोपींना आतूनच पुरवली जात होती. याच माहितीच्या आधारे आरोपींनी दरोड्याचा कट रचून अंमलबजावणी केली.
पोलिसांनी आतापर्यंत २४.३० लाख रुपये रोख रक्कम तसेच सुमारे ९० हजार रुपयांचे परकीय चलन जप्त केले आहे. एकूण २५.२० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उर्वरित रक्कम आणि इतर संबंधित बाबींचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली असून कंपन्यांमधील अंतर्गत माहितीचा गैरवापर करून गुन्हे कसे घडवले जातात याचे हे गंभीर उदाहरण मानले जात आहे. पोलिसांनी या टोळीचे आणखी काही साथीदार आहेत का, याचा तपास सुरू ठेवला असून पुढील काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सहकारनगर पोलिसांच्या या कारवाईचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावून बहुतांश मुद्देमाल परत मिळवल्याने तक्रारदाराला मोठा दिलासा मिळाला आहे.