पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्या तात्काळ बदलीची किंवा सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी केली आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी, कोयता गँगचा वाढता धुमाकूळ, महिलांवरील अत्याचार तसेच नुकत्याच घडलेल्या विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आज गुन्हेगारीचे केंद्र बनत चालले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे,” असे त्या म्हणाल्या.
सुळे यांनी दावा केला की, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार पुणे शहर गुन्हेगारीच्या बाबतीत देशात पाचव्या क्रमांकावर असून महाराष्ट्रात अव्वल स्थानावर आहे. शहरात कोयता गँगच्या घटना, मारहाण, खून, लूटमार, महिलांवरील अत्याचार आणि विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुणे पोलीस आणि राज्याच्या गृह विभागाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. “सध्याच्या परिस्थितीसाठी पोलीस आयुक्त जबाबदार आहेत. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे,” अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांना रात्री दुकाने बंद करण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांमध्ये व्यवसाय रात्रीपर्यंत सुरू असतात. मात्र पुण्यात व्यापाऱ्यांना लवकर दुकाने बंद करण्यास भाग पाडले जात आहे. हा प्रश्न गंभीर आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अलीकडेच समोर आलेल्या कथित विषारी दारूकांडाचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनावर कठोर शब्दांत टीका केली. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, परिस्थिती सुधारली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला. “सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. इतर राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी नागपूरमध्ये गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला, तर पुण्यात ती वाढल्याचे सांगितले. तसेच भाजपमध्ये अनेक माजी काँग्रेस नेते आणि कुटुंबे सहभागी झाल्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपवरही टीका केली.
नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. “तंत्रज्ञानाच्या युगातही पेपरफुटीच्या घटना कशा घडतात, हा गंभीर प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे पुण्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.