ठाण्यात शाळा प्रवेशोत्सवाचा उत्साह; विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा संदेश, महापालिका शाळांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करत ठाण्यातील किसन नगर येथील महापालिका शाळा क्रमांक २३ मध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती लावत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पुस्तके आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, ज्यामुळे शाळेचा परिसर आनंद, उत्साह आणि नव्या आशांनी फुलून गेला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. “जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नाही. यश हे परिस्थितीवर नाही तर प्रयत्नांवर अवलंबून असते,” असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी त्यांनी स्वतःच्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. “मी स्वतः याच महापालिका शाळेचा विद्यार्थी होतो. याच शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये बसून शिक्षण घेतले. त्यामुळे या शाळेशी माझे भावनिक नाते आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या या आठवणी ऐकताना विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली.
महापालिका, जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील अनेक महान व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे दिली. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांसारख्या अनेक व्यक्तींनी साध्या शाळांमधून शिक्षण घेत यशाचे सर्वोच्च शिखर गाठल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षकांच्या भूमिकेवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आई-वडील जन्म देतात, पण विद्यार्थ्यांना आकार देण्याचे, घडविण्याचे आणि संस्कार करण्याचे महान कार्य शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर चांगले संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जाणीवही देणे आवश्यक आहे.”
यावेळी त्यांनी महापालिका शाळांमधील मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला. स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, सुसज्ज स्वच्छतागृहे, सुरक्षित वर्गखोल्या आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच महापालिका शाळांना अचानक भेटी देऊन सुविधांची पाहणी करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महापालिका शाळांच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.” त्यांच्या या घोषणेमुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात होत असल्याने पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शाळा गळती रोखणे, प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे या उद्दिष्टांना या प्रवेशोत्सवामुळे अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
या कार्यक्रमाला महापौर शर्मिलाताई पिंपळोलकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, शिवसेना सचिव तथा नगरसेवक राम रेपाळे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संध्याताई मोरे, मुख्याध्यापक दीपक मोराळकर, शिक्षण उपायुक्त मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, माजी नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ, गुरुमुख सिंह श्यान, परेश चाळके, सुनील मोरे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक भावना निर्माण करण्याबरोबरच सरकारी आणि महापालिका शाळांबाबतचा विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाण्यातील हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात म्हणून त्याची चर्चा होत आहे.