Home Breaking News पुण्यात प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरवर मोठा घाव; अंमली पदार्थ विरोधी पथकाची...

पुण्यात प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरवर मोठा घाव; अंमली पदार्थ विरोधी पथकाची सहा ठिकाणी धडक कारवाई

72
0
पुणे : पुणे शहरात तरुणाईला व्यसनाधीन करण्याचा धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित ई-सिगारेट (वेप) आणि तबाखुजन्य हुक्का फ्लेवरच्या अवैध विक्रीविरोधात अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. शहरातील कोरेगाव पार्क, कॅम्प, कोथरूड आणि लष्कर परिसरातील एकूण सहा ठिकाणी छापे टाकून तब्बल ८,३२,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम २०१९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली असून, लष्कर आणि कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कोथरूड आणि लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधित हुक्का फ्लेवर विक्रीप्रकरणी आणखी ३ खटले दाखल करण्यात आले आहेत.
छापेमारीदरम्यान पोलिसांनी २९७ ई-सिगारेट (वेप) तसेच ८९५ तबाखुजन्य हुक्का फ्लेवर जप्त केले. ही उत्पादने बेकायदेशीररीत्या साठवून विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी हुसेन अब्दुल रहेमान, हसन शेख आणि अब्दुल इस्माईल जाबीर या तीन आरोपींना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध वेप व हुक्का फ्लेवर विक्रीला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढणाऱ्या या घातक ट्रेंडवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने शून्य सहनशीलतेची भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
ही प्रभावी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त श्री. निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुणे पोलिसांकडून भविष्यातही अशा अवैध आणि आरोग्यास घातक पदार्थांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.