Home Breaking News Grindr अॅपवरून सापळा रचत लूटमार करणारी टोळी गजाआड; कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई

Grindr अॅपवरून सापळा रचत लूटमार करणारी टोळी गजाआड; कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई

58
0
पुणे : समलिंगी डेटिंग अॅप Grindr चा गैरवापर करत निष्पाप नागरिकांना सापळ्यात अडकवून त्यांची जबरी लूट करणाऱ्या टोळीला कोंढवा पोलीस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात पोलिसांची सज्जता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी यांना Grindr अॅपवरून संपर्क साधून डेटिंगच्या बहाण्याने रात्री एका मोकळ्या मैदानात बोलावण्यात आले. तेथे आरोपींनी लोखंडी शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल फोन, सोन्याची चैन, अंगठी तसेच एटीएमद्वारे रोख रक्कम अशी जबरी चोरी केली. या घटनेनंतर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल नंबर ट्रेसिंग आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर सापळा रचून पाच आरोपींना कोंढवा व कात्रज परिसरातून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ३ मोबाईल फोन, लोखंडी कोयता तसेच गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
तपासादरम्यान या टोळीने अशाच प्रकारचे आणखी दोन गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याबाबतचे गुन्हेही उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, काही आरोपी अल्पवयीन असून ते सोशल मीडियाचा गैरवापर करत गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आले आहे. यामुळे पालकांनी आणि नागरिकांनी ऑनलाईन डेटिंग अॅप्स वापरताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नवनाथ जगताप व पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने केली.
पुणे शहरात वाढत चाललेल्या सायबर आणि सोशल मीडिया आधारित गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.