Home Breaking News पैशांच्या वादातून मित्राचाच खून; १२ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश

पैशांच्या वादातून मित्राचाच खून; १२ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश

57
0
पुणे : पैशांच्या लालसेपोटी मित्रालाच संपवण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला असून, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी अवघ्या १२ तासांच्या आत खुनातील सर्व आरोपींना जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या जलद कारवाईमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेवर असलेला पोलिसांचा वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गु.र.नं. २७/२०२६ भा.न्या.सं.क. १०३(१) या खुनाच्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना, पोलीस अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गणपती माथा ते शिंदे पूल दरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी राजेंद्र सुभाष ऐलगच्चे या तरुणाला २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री आकाशनगर शनि मंदिर टेकडी, वारजे येथे पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून बोलावले. तेथे त्याच्यावर लोखंडी हत्याराने गळा, छाती, पोट व पायावर वार करून, तसेच डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
शुभम राजेश शिंदे (२५), लकी सुरेंद्र सिंग (२३), सुनील संतोष खलसे ऊर्फ एस.के. (१९) तसेच एक विधीसंघर्षित बालक यांचा समावेश आहे. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त श्री. निखिल पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दत्ताराम बागवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पुणे पोलिसांच्या या जलद व प्रभावी तपासामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या आरोपींना लपण्यास जागा नाही, असा स्पष्ट संदेश समाजात गेला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशाच कडक कारवाया पुढेही सुरू राहतील, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.