Home Breaking News पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त…

पुण्यात मुसळधार पावसाचा कहर! रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त…

122
0

पुणे – गुरुवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे पुणे शहरात अनेक भाग जलमय झाले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

भारत हवामान विभागानुसार, १९ जून रोजी सकाळी १२ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत पुण्यात तब्बल ५४.२ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका हिंजवडी, मुंढवा, कोथरूड, हिंजवडी, साईनगर (हिंगणे), सिंहगड रोड, पर्वती, स्वारगेट, आणि धनकवडी परिसराला बसला.

साईनगरमध्ये घरात शिरले पाणी

हिंगणेतील साईनगर भागात एका वर्षापासून दुर्लक्षित असलेली वनविभागाची भिंत कोसळली आणि त्यामुळे पावसाचे पाणी थेट रहिवाशांच्या घरात घुसले. स्थानिक रहिवासी गोंविद गोरे यांनी यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. “जर रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाला, तर येथे राहणे अत्यंत धोकादायक ठरेल,” असे त्यांनी सांगितले.

शिवशंभो नगरात भीतीदायक खड्डा

VIIT कॉलेजच्या मागील गल्लीत, सिटी टॉवरजवळच्या शिवशंभो नगरात एक मोठा खड्डा पडल्याचे आढळून आले असून त्यामुळे भूस्खलनाची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पाषाण परिसरात दुर्घटना – C-DAC विद्यार्थिनी जखमी

पाषाणमधील पंचवटी येथे निशिगंध इमारतीसमोर झाड कोसळून २२ वर्षीय काजल हिच्या डोक्याला दुखापत झाली. काजल ही C-DACची विद्यार्थीनी असून, झाड कोसळताना तिथे उभी असलेली एक चारचाकी आणि दोन दुचाकीही पूर्णतः नुकसान झाल्या. पुणे अग्निशमन दलाच्या तत्काळ प्रतिसादामुळे काजलला वाचवण्यात आले आणि तिला तातडीने औंधमधील साईश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हवामान खात्याचा अंदाज – २० जून रोजीही जोरदार पावसाची शक्यता

IMD चे वरिष्ठ हवामान तज्ज्ञ एस. डी. सनप यांनी सांगितले की, “सध्या मान्सून सक्रीय असून, कोकण ते उत्तर कर्नाटक दरम्यान समुद्रकिनारी तटबंदी (offshore trough) तयार झाली आहे. त्यामुळे पावसाची तीव्रता वाढलेली आहे. २० जून रोजीही असाच पाऊस अपेक्षित असून त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.”

पावसाच्या पाण्यात वाहून गेलं पुणं!

➡️ संततधार पावसामुळे रस्ते जलमय
➡️ साईनगरमध्ये घरात पाणी
➡️ झाड कोसळून विद्यार्थिनी जखमी
➡️ मोठा खड्डा – भूस्खलनाचा धोका
➡️ नागरिकांनी सतर्क राहावे – प्रशासनाची विनंती