पिंपरी, दि. २८ जुलै :- “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे आणि परिवर्तनाची दिशा दाखविणारे आहेत. त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६ यंदापासून सात दिवस विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. प्रथमच आयोजित करण्यात येणारी ‘साहित्यरत्न दौड’ ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारी आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ठरेल. तसेच महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेमुळे राज्यातील व जिल्ह्यातील खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्याची उत्तम संधी मिळेल. नागरिकांनी या दोन्ही उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व,तसेच या पर्वांतर्गत प्रथमच ‘साहित्यरत्न दौड २०२६’ या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर माजी नगरसदस्य दिवंगत सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ १९ वी महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२६ देखील आयोजित करण्यात आली आहे यासाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,क्रीडा,कला व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे,नगरसदस्य अनिल घोलप, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मधुरा शिंदे, माजी नगरसदस्य मारूती भापकर,उप आयुक्त पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे तसेच अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
‘साहित्यरत्न दौड २०२६’ रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली असून, ३ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा दोन गटांमध्ये ही दौड होणार आहे. सुमारे ४ हजाराहून अधिक युवक-युवती व नागरिक या दौडीत सहभागी होणार असून, या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रसार, आरोग्याबाबत जनजागृती आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.
दौडीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सहभागींसाठी वैद्यकीय पथक, ॲम्ब्युलन्स, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर आवश्यक नियोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत.
तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आणि नवरात्र मित्र मंडळ, इंद्रायणीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ १९ वी महापौर चषक जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा २९ ते ३१ जुलै या कालावधीत कै. मनिषा भोईर विरंगुळा केंद्र, प्रेमलोक पार्क, सावरकर उद्यानाशेजारी, चिंचवड येथे होणार आहे. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि. २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार असून, जिल्ह्यातील पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिक गटातील ४०० हून अधिक कॅरमपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेतील पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिक गटातील विजेत्यांना लाखांची रोख बक्षिसे तसेच ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील कॅरमपटूंना आपले कौशल्य सादर करण्यासाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होणार असून, शहरातील क्रीडा संस्कृतीला अधिक चालना मिळणार आहे.