पिंपरी, दि. २८ जुलै २०२६ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे शहरीकरण आणि वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ई-आरटीएस प्रणालीचे संगणकीय सादरीकरण केले. ही प्रणाली मेट्रोप्रमाणे वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी असून रबर टायरवर धावणाऱ्या पूर्णतः इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित असेल. एका वाहनातून सुमारे २४० हून अधिक प्रवाशांना प्रवास करता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १७ किलोमीटरचा प्रायोगिक मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव असून, गोडाऊन चौक–कुदळवाडी चौक–ऑटो क्लस्टर–काळेवाडी फाटा–जगताप डेअरी चौक–वाकड या प्रमुख भागांना या मार्गाद्वारे जोडण्यात येणार आहे. महामेट्रोच्या सहकार्याने हा प्रकल्प सुमारे एक ते दीड वर्षांच्या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर एचसीएमटीआर आणि शहरातील बीआरटी मार्गांवर ई-आरटीएस प्रणालीचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे. तसेच मेट्रो, रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी सुलभ जोडणी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणात घट होण्यास आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास मदत होणार आहे. नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक आणि नियोजनासंदर्भातील कार्यवाही तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेता हा प्रकल्प पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.