Home Breaking News ख्रिस्तोपर राजमनी यांची आरपीआय (आठवले) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती

ख्रिस्तोपर राजमनी यांची आरपीआय (आठवले) ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती

24
0
पुणे,  : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रथमच ख्रिश्चन आघाडीची स्थापना करण्यात आली असून, या आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी ख्रिस्तोपर राजमनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पुण्यातील डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी, रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.
नियुक्तीपत्रात ख्रिस्तोपर राजमनी यांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांशी निष्ठावंत राहून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्य करावे, तसेच पीडित, वंचित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पक्षामध्ये समन्वय राखत संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले.
यावेळी प्रदेश संघटन सचिव तथा माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे सरचिटणीस महिपाल वाघमारे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस शाम सदाफुले, नगरसेवक निलेश अल्हाट, सचिन मानोतकर, हिमाली कांबळे, अर्जुन अल्हाट, जयदेव रणदिवे, आकाश पवार, असित भोसले, अशोक गायकवाड (वाई), सूर्यकांत वाघमारे (लोणावळा) यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ख्रिस्तोपर राजमनी यांच्या नियुक्तीमुळे ख्रिश्चन समाजातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्यास मदत होईल तसेच रिपब्लिकन पक्षाचे सामाजिक व संघटनात्मक कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.