देहूरोड : देहूरोड-निगडी मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी दरम्यान प्रस्तावित असलेल्या दोन भुयारी मार्गांना (अंडरपास) तत्त्वतः मंजुरी मिळाली असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
देहूरोड येथील सदर्न कमांड कार्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सदर्न कमांडचे ब्रिगेडियर आशिष कटोज, कर्नल अमित श्रीवास्तव, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत यादव, एमएसआरडीसीचे उपअभियंता विकास पिंपळकर, कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य कैलास पानसरे, शिवसेना पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या दोन भुयारी मार्गांना मान्यता मिळाली आहे. त्यानंतर संरक्षण विभाग, सदर्न कमांड आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाशी चर्चा करण्यात आली. या बैठकीत संबंधित यंत्रणांनी तत्त्वतः संमती दर्शविल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या भुयारी मार्गांमुळे केंद्रीय विद्यालय, ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर आणि आसपासच्या वसाहतींमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दररोज हजारो विद्यार्थी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक या मार्गाचा वापर करतात. वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता या प्रकल्पाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. आता या प्रकल्पाला गती मिळाल्याने स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
बैठकीत काळोखे मळा ते हगवणे वस्ती दरम्यानच्या रस्त्याच्या दुरवस्थेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारा हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत.
याशिवाय, पुढील महिन्यात पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गाची दुरुस्ती करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. संरक्षण विभागाच्या जागेतून जाणाऱ्या या मार्गावरील खराब रस्त्यांमुळे वारकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामालाही संरक्षण विभागाकडून आवश्यक मंजुरी देण्यात आली आहे.
किवळे परिसरातील महावितरणच्या वीजवाहिन्यांचा प्रश्न, संरक्षण विभागाच्या हद्दीतील विविध नागरी सुविधांशी संबंधित विषय तसेच प्रलंबित विकासकामांवरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
देहूरोड, किवळे, निगडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना आता गती मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः भुयारी मार्ग उभारणीमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.