पुणे – पुणे-नाशिक महामार्गावरून धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या एसटी बसमध्ये घुसून काही तरुणांनी चालक आणि कंडक्टरला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला असून, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा संपूर्ण प्रकार बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडीला कट मारल्याचा राग मनात धरत मंचरमधील काही तरुणांनी खेड घाटात थार गाडी एसटीसमोर आडवी लावली. वाहन जबरदस्तीने थांबवल्यानंतर हे तरुण थेट बसमध्ये घुसले आणि कोणतीही तक्रार न देता चालक व कंडक्टरवर हल्ला चढवला. त्यांनी हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. परिस्थिती हाताबाहेर जात असताना बसमधील वृद्ध प्रवाशांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु मारेकऱ्यांनी त्यांचेही ऐकले नाही.
या धक्कादायक घटनेमुळे बसमधील महिलांनी किंकाळ्या फोडल्या, काही प्रवासी घाबरून सीटखाली लपले. चालकाने मारहाणीच्या अवस्थेतही बस स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, अन्यथा मोठा अपघात होऊ शकला असता. हल्ल्यानंतर आरोपी तिथून पसार झाले.
एसटी प्रशासनाने या घटनेचा निषेध केला असून,
-
आरोपींविरुद्ध कडक गुन्हे नोंदवणे,
-
महामार्गावरील पोलीस गस्त वाढवणे,
-
सर्व बसमध्ये व्यवस्थित सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.







