पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत इतिहास घडवत मालमत्ता कर वसुलीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात विभागाला यश आले असून, महापालिकेच्या इतिहासातील ही पहिल्या तिमाहीतील सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. नागरिकांनी वेळेत कर भरत विविध सवलतींचा लाभ घेतल्यामुळे शहराच्या विकासासाठी आर्थिक बळकटी मिळाली आहे.
महापालिकेच्या नोंदीनुसार, शहरात निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक आणि इतर मिळून ७ लाख ४४ हजार ६३० मालमत्ता नोंदणीकृत आहेत. त्यापैकी ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी पहिल्याच तिमाहीत कराचा भरणा केला आहे. म्हणजेच जवळपास ५९.८४ टक्के मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरत महापालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
विशेष म्हणजे, कर भरणाऱ्या नागरिकांपैकी ३ लाख ४७ हजार ५६४ मालमत्ताधारकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरला, ज्यामुळे डिजिटल व्यवहारांनाही मोठी चालना मिळाली. ऑनलाइन कर भरणाऱ्यांनी महापालिकेने जाहीर केलेल्या विविध सवलतींचा लाभ घेतला. त्यामुळे नागरिकांचा कल आता डिजिटल आणि पारदर्शक सेवांकडे वाढत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
कर आकारणी व कर संकलन विभागाने यंदा कर वसुलीसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती, एसएमएसद्वारे सूचना, ऑनलाइन सुविधा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता कर बिलांचे वितरण अशा विविध उपक्रमांमुळे नागरिकांना वेळेत कर भरणे अधिक सोयीचे झाले. या उपक्रमांचा थेट परिणाम कर वसुलीवर झाल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
ऑनलाइन व्यवहारांचा दबदबा
यंदाच्या कर वसुलीत सर्वाधिक हिस्सा ऑनलाइन माध्यमांचा राहिला. एकूण ४०७ कोटी ८९ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा झाले. त्याशिवाय रोख स्वरूपात २१ कोटी ४७ लाख रुपये, धनादेशाद्वारे १६ कोटी २४ लाख रुपये, डिमांड ड्राफ्टद्वारे १५ कोटी ७५ लाख रुपये, तर विविध डिजिटल अॅप्सच्या माध्यमातून १० कोटी ४५ लाख रुपयांचा कर जमा झाला.
निवासी मालमत्ताधारकांचा सर्वाधिक सहभाग
कर भरणाऱ्या मालमत्तांमध्ये ३ लाख ८२ हजार ५२२ निवासी मालमत्ता आघाडीवर राहिल्या. त्याशिवाय ३३ हजार ७९३ बिगरनिवासी, ८ हजार ६२३ मिश्र वापराच्या, ३ हजार ७५ औद्योगिक, २ हजार ५९१ मोकळ्या जमिनी आणि १३ इतर प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे.
वाकड झोन ठरला अव्वल
महापालिकेच्या १८ कर संकलन झोनपैकी वाकड विभागीय कार्यालयाने सर्वाधिक ७२ कोटी ८७ लाख रुपयांची कर वसुली करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर थेरगाव – ४६.७१ कोटी, किवळे – ३८.३७ कोटी, कस्पटे वस्ती – ३९.३३ कोटी, चिखली – ३७.९५ कोटी, भोसरी – ३४.७३ कोटी, चिंचवड – ३४.४७ कोटी, पिंपरी वाघेरे – ३२.५३ कोटी, मोशी – ३१.२२ कोटी, मनपा भवन – २८.७५ कोटी, सांगवी – २६ कोटी, आकुर्डी – २३.९० कोटी, फुगेवाडी – २०.९७ कोटी, चार्होली – १७.८२ कोटी, निगडी प्राधिकरण – १३.२५ कोटी, दिघी-बोपखेल – ११.८८ कोटी, तळवडे – ११.२३ कोटी, तर पिंपरीनगर – ३.९९ कोटी रुपयांची कर वसुली झाली.
सहा वर्षांत कर वसुलीचा वाढता आलेख
महापालिकेच्या आकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीतील कर वसुलीत सातत्याने वाढ होत आहे.
-
२०२१-२२ : १७१ कोटी रुपये
-
२०२२-२३ : २५५ कोटी रुपये
-
२०२३-२४ : ४५४ कोटी रुपये
-
२०२४-२५ : ४४० कोटी रुपये
-
२०२५-२६ : ५२४ कोटी रुपये
-
२०२६-२७ : ५२६ कोटी १४ लाख रुपये





