Home Breaking News रायगडच्या ग्रामीण शिक्षणात डिजिटल क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर’चे...

रायगडच्या ग्रामीण शिक्षणात डिजिटल क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर’चे उद्घाटन

30
0
पनवेल : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वहाळ येथील पी.एम. श्री. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर’ (Interactive Digital, Experimental, Administration and Learning Centre) चे उद्घाटन केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या नव्या युगाची दारे खुली झाली आहेत.
शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या आयडियल सेंटरमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आणि ऑडिओ स्वरूपातील अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे इंग्रजी, मराठी आणि उर्दू या तीन भाषांमध्ये सर्व विषयांचे अध्ययन करता येणार असल्याने विविध भाषिक विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सॉफ्टवेअर-आधारित शिक्षण प्रणाली विकसित करण्यात आली असून अभ्यासक्रम अधिक रंजक, सोपा आणि परिणामकारक बनविण्यात आला आहे. केंद्रात विद्यार्थ्यांसाठी २४ संगणक आणि शिक्षकांसाठी स्वतंत्र संगणकाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
या डिजिटल शिक्षण केंद्रामध्ये ई-डेस्क, ई-पोडियम, इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड, डिजिटल स्क्रीन प्रेझेंटेशन, स्मार्ट क्लासरूम आणि परीक्षा व्यवस्थापनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
विशेष बाब म्हणजे या केंद्रातील सॉफ्टवेअर ९० टक्के ऑफलाइन पद्धतीने कार्यरत राहणार असल्याने अखंड इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही. ग्रामीण भागात इंटरनेटच्या मर्यादित सुविधांचा विचार करून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे नेटवर्कच्या अडचणीमुळे शिक्षणात खंड पडणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळणे ही शासनाची प्राथमिकता आहे. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, सर्जनशीलता आणि स्पर्धात्मक कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल. भविष्यात अशा प्रकारची केंद्रे राज्यातील इतर ग्रामीण भागातही उभारण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल घडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या भविष्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रायगड जिल्ह्यातील हे आयडियल सेंटर आता ग्रामीण शिक्षणाच्या परिवर्तनाचे नवे मॉडेल ठरणार असून आधुनिक महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे.