पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेअंतर्गत आज आकुर्डी येथील हॉटेल मॅजेस्टिक परिसरातील मोठ्या प्रमाणावरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १५ मधील सर्वे क्रमांक ७/१/१ब येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत आरसीसी बांधकामे आणि पत्राशेड यांचे निष्कासन करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महापालिकेने अनधिकृत बांधकामधारकांना कडक इशारा दिला आहे.
महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या धडक कारवाई पथकाने सकाळपासूनच परिसरात मोर्चा वळवला. हॉटेल मॅजेस्टिक तसेच त्याच्या आसपास उभारण्यात आलेल्या अनधिकृत संरचनांवर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सुमारे १२ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. अनेक वर्षांपासून नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या या संरचनांमुळे परिसरातील नियोजनावर परिणाम होत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. प्रशासन अधिकारी प्रिया गोरखे, बांधकाम परवानगी विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
कायदोमोडीची कोणतीही घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. निगडी पोलीस ठाण्याचे २० पोलीस कर्मचारी, महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील २० कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान तसेच महापालिका मजूर यांच्या उपस्थितीत संपूर्ण कारवाई शांततेत पार पडली. याशिवाय ३ जेसीबी, १ पोकलेन मशीन आणि १५ मजुरांच्या मदतीने अवघ्या काही तासांत मोठ्या प्रमाणावरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
शहरातील अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूक, सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि विकास आराखड्याच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम होत असल्याचे महापालिकेचे मत आहे. त्यामुळे शहराच्या नियोजित आणि शाश्वत विकासासाठी अशा नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेने नागरिकांना कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेण्याचे आणि बांधकाम नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय उभारण्यात आलेली कोणतीही बांधकामे नियमबाह्य असून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. नागरिकांची सुरक्षितता, शहराचा विकास आराखडा आणि भविष्यातील पायाभूत सुविधांचा विचार करून अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक क्षेत्रात अशा कारवायांचे सातत्य राखले जाईल.”
या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकामधारकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून पिंपरी-चिंचवड शहरात नियमबाह्य बांधकामांविरोधात महापालिकेने झिरो टॉलरन्सची भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.