पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात संशयास्पद मृत्यूंच्या वाढत्या घटनांनी खळबळ उडाली असून गावठी केमिकलयुक्त दारूमुळे तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात सहा जणांचा तर पुण्यातील हडपसरमधील काळेपडळ येथे पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर हादरले आहे.
सुरुवातीला फुगेवाडी परिसरातील मृत्यू हृदयविकार आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र पुढील तपासात या मृत्यूंचा संबंध केमिकलयुक्त गावठी दारूशी असल्याचे समोर आल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणामुळे पोलिस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिसांनी या प्रकरणात योगेश वानखेडे या संशयित आरोपीला अटक केली आहे. तो फुगेवाडी आणि काळेपडळ परिसरात स्पिरिट मिश्रित केमिकलयुक्त गावठी दारू पुरवत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, योगेश वानखेडे हा अनेक वर्षांपासून बेकायदेशीर दारू व्यवसायात सक्रिय होता आणि त्याच्यावर याआधीही २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये गुन्हे दाखल झाले होते.
विशेष म्हणजे तो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाही त्याच्यावर कठोर कारवाई का झाली नाही? त्याचा अवैध व्यवसाय सुरूच कसा राहिला? याबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत. “वेळेत कारवाई झाली असती तर आज निष्पाप नागरिकांचे जीव वाचले असते,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांकडून दिली जात आहे.
फुगेवाडी आणि काळेपडळ परिसरात मृत्यू झालेल्या व्यक्तींनी कथितरित्या स्वस्तात मिळणारी गावठी दारू सेवन केली होती. ही दारू अत्यंत घातक रसायने मिसळून तयार करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काहींना दारू सेवनानंतर अचानक प्रकृती बिघडणे, उलट्या, चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसून आली होती. मात्र सुरुवातीला या मृत्यूंकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याची चर्चा सुरू आहे.
या प्रकरणानंतर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “एक्साईज विभागाला या अवैध व्यवसायाची माहिती नव्हती का?”, “स्थानिक पोलिसांनी यापूर्वी कोणती कारवाई केली?”, “दारू पुरवठ्याचे जाळे किती मोठे आहे?” असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी अवैध दारू विक्रीविरोधात कठोर मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. स्थानिक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
रात्री उशिरा योगेश वानखेडे हा उत्पादन शुल्क विभागासमोर शरण आला. त्यानंतर त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांकडून संबंधित दारू तयार करणारे, वितरक आणि पुरवठा साखळीतील इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, केमिकलयुक्त गावठी दारूमध्ये मेथेनॉलसारखी घातक रसायने मिसळली जातात. ही दारू शरीरासाठी अत्यंत धोकादायक असून अंधत्व, अवयव निकामी होणे आणि मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे अशा अवैध व्यवसायांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि बेकायदेशीर दारू माफियांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.