Home Breaking News प्रभाग क्र. १० मधील नागरी समस्यांवर नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांच्याकडून ‘ऑन द...

प्रभाग क्र. १० मधील नागरी समस्यांवर नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांच्याकडून ‘ऑन द स्पॉट’ तोडगा! पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची घेतली समन्वय बैठक

29
0
पिंपरी-चिंचवड, २५ मे २०२६ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने, जागेवरच उपाययोजना करण्यासाठी एका विशेष समन्वय बैठकीचे आयोजन श्री सिद्धिविनायक मंदिर, संभाजीनगर, चिंचवड येथे आमदार श्री. अमितजी गोरखे यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या बैठकीत नागरिकांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर थेट आपल्या समस्या मांडल्या, ज्यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या समस्यांचे लवकरात लवकर समाधान करण्याचे आश्वासन दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, उद्यान विभाग आणि विद्युत विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेविका सौ. सुप्रियाताई चांदगुडे, नगरसेवक श्री. कुशाग्रदादा कदम आणि नगरसेवक श्री. तुषारभाऊ हिंगे यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या मागण्यांचा पाठपुरावा केला.



या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होऊन तातडीने पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी स्ट्रोम वॉटर, उद्यान विभाग व झाडांची छाटणी, विद्युत विभागाची कामे तसेच प्रभागातील भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास कमी करणे, तसेच वाहतूक व पार्किंगचे योग्य नियोजन करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याचे देखील यावेळी नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांनी सांगितले.

प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत ही समन्वय बैठक घेण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे पालिकेमार्फत वेळेत निवारण केले जाईल, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन यावेळी नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांनी केले. या बैठकीला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला व जागरूक रहिवाशांनी अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न प्रशासनासमोर मांडले.