Home Breaking News अंजनगाव सुर्जी मतमोजणीत गैरप्रकाराचा आरोप; फेर मतमोजणीस नकार दिल्याने काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

अंजनगाव सुर्जी मतमोजणीत गैरप्रकाराचा आरोप; फेर मतमोजणीस नकार दिल्याने काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

77
0
अंजनगाव सुर्जी येथे झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत गंभीर घोळ झाल्याचा आरोप करत काँग्रेस उमेदवार आयशा बानो रशीदखान यांनी निवडणूक प्रशासनावर थेट बोट दाखवले आहे. मतमोजणीदरम्यान अनेक ठिकाणी संशयास्पद प्रकार घडल्याचा दावा करत, त्या ठिकाणी फेर मतमोजणी करण्यात यावी अशी स्पष्ट मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावल्याने वादाला तोंड फुटले आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने याप्रकरणी मतमोजणी व निकाल जाहीर झाल्याचा संपूर्ण व्हिडीओ अर्ज करून मागवण्यात आला असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत अशा प्रकारची बेपर्वाई आणि संभाव्य बदमाशी कदापि सहन केली जाणार नाही.
यासंदर्भात काँग्रेस उमेदवार आयशा बानो रशीदखान यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “निवडणूक अधिकाऱ्यांनी फेर मतमोजणी करण्यास नकार देऊन जनतेच्या मतदानाच्या हक्कावर घाला घातला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, आम्ही कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाणार आहोत. ही बदमाशी आम्ही खपवून घेणार नाही.”
या प्रकरणामुळे अंजनगाव सुर्जी परिसरात राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घ्यावी अशी जोरदार मागणी होत आहे. लोकशाहीवरील विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.