मुंबई : अंधश्रद्धा, अघोरी प्रथा आणि काळ्या जादूच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून महिलांचा गैरफायदा घेणाऱ्या एका भोंदूबाबाला संताक्रूज पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपीचे नाव अब्दुर रशीद अब्दुल लतीफ शेख उर्फ बबाजान (वय 36, राहणार सेक्टर 10E, कलंबोली, नवी मुंबई) असे आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या वैवाहिक आयुष्यात वाद सुरु असल्याचे कळल्यावर बबाजान तिच्या संपर्कात आला. त्याने पीडितेला सांगितले की ती “वाईट शक्तींच्या प्रभावाखाली आहे” आणि विशेष तंत्र-विदी करून तो तिला बरे करेल, असे आश्वासन दिले.
‘उपचार’च्या नावाखाली अमानुष कृत्य आरोपीने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून धूपाचा वास देत तिला बेशुद्ध केले, आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केला. इतकेच नव्हे, तर आरोपीने आरोपीनं अमानुष पद्धतीने कठीण वस्तू तिच्या गुप्तांगात घुसवली, असा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे.
पोलिस कारवाई सदर घटनेनंतर संताक्रूज पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 871/2025 नुसार भोंदूबाबाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 64, 74, 76, 115, 118(1), 123, 351(2) तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तुषार सावंत यांच्या पथकाने मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. कलंबोली पोलिसांच्या मदतीने बबाजानला त्याच्या राहत्या घरातून अटक करून पुढील चौकशीसाठी संताक्रूज पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
समाजाला इशारा या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकण्याचे दुष्परिणाम स्पष्ट झाले आहेत. पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, कोणत्याही अडचणीत काळ्या जादू, झाडफूक किंवा अघोरी प्रथांच्या नावाखाली उपचार करणाऱ्या व्यक्तींना बळी पडू नका. अशा घटनेतून समाजात जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित होत आहे.“मुंबईत काळ्या जादूच्या नावाखाली महिलेला फसवले – बबाजान नावाचा भोंदूबाबा अटक”