पुणे – हडपसर परिसरातील साडेसतरानळी आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्यामधील व्यापारी व नागरिक ४ ऑगस्ट २०२५ च्या रात्री भीतीच्या सावटाखाली गेले होते. कारण, अज्ञात सहा जणांनी दोन दुचाकींवर येत हातातील लोखंडी हत्यारांनी दुकाने, गाड्यांची तोडफोड करत मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ केली आणि परिसरात उघडपणे दहशत माजवली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तत्काळ गु.र.नं. ७११/२०२५ भा.न्या.सं. कलम १८९(२),(४), १९१(२),(३), ३२४(५), ३५२, आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(३)(१) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उप-आयुक्त (परिमंडळ ५) डॉ. राजकुमार शिंदे यांनी तात्काळ विशेष तपास पथकाला आदेश दिले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास केला. फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्यात आली. दरम्यान, गुप्त बातमीच्या आधारे अहिल्यानगर बस स्टँड येथे सापळा रचून आरोपी श्रेयस विकास आलेकर (२०, रा. हडपसर), रोहित संदीप खाडे (१९, रा. गोकुळनगर, कात्रज) आणि चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी व लोखंडी हत्यारे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व रहिवाशांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
या यशस्वी मोहिमेत अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, आणि पोलिस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखील पवार, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
पुणे पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता आणि समन्वयित कारवाई पुन्हा एकदा सिद्ध करते की शहरातील शांतता भंग करणाऱ्यांना कायद्याच्या कठोर कारवाईपासून सुटका नाही.