पुणे – देशातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या TCS (Tata Consultancy Services) च्या पुणे ऑफिसबाहेर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीकडून थकवलेल्या पगाराच्या मागणीसाठी सौरभ मोरे या तरुणाने थेट ऑफिसबाहेरील फूटपाथवर झोपून आंदोलन केलं.
सौरभ मोरे याने आपल्या शारीरिक आणि मानसिक कष्टांचे मोबदले मिळावे यासाठी रात्रीच्या अंधारातही न डगमगता लढा दिला. त्याचा फूटपाथवर झोपलेला फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे. बॅग उशाला घेऊन, बाजूला पत्र ठेऊन शांततेने आंदोलन करणाऱ्या या तरुणाच्या संघर्षाने अनेकांचे मन हेलावले.
पत्रात त्याने लिहिलं होतं, “माझ्याकडे पैसे नाहीत, माझा पगार मिळालेला नाही. मला घरही नाही. आता इथेच झोपतो. न्याय मिळवण्यासाठी इथंच थांबतो.”
या घटनेनंतर Forum of IT Employees या संघटनेने सौरभच्या समर्थनार्थ आवाज उठवला. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “आम्ही सौरभ मोरे याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्याने केलेलं हे आंदोलन अत्यंत धाडसी आहे. अशा परिस्थितीतही त्याने आपला हक्क मागितला हे प्रेरणादायी आहे.”
त्याचबरोबर, या प्रकरणावर टीसीएसनेही स्पष्टीकरण दिलं असून, ते म्हणाले, “कर्मचाऱ्याच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहून योग्य ती कार्यवाही केली जाईल.”
ही घटना केवळ एका कर्मचाऱ्याचा संघर्ष दाखवत नाही, तर आयटी क्षेत्रातील कार्यसंस्कृती, कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत प्रश्न उपस्थित करत आहे. पगार हा केवळ आर्थिक व्यवहार नसून, तो मेहनतीचा सन्मान आहे – आणि त्यासाठी झगडणं ही काळाची गरज आहे.