पुणे (दि. १९ जून २०२५) – संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुणे शहरात २० जून रोजी आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी तसेच पालखी मार्गावरील शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक विभागाने अनेक रस्त्यांवर तात्पुरते निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी माहिती दिली की, मोटार वाहन कायद्यानुसार (कलम ११५, ११६ व ११७) मिळालेल्या अधिकारांचा वापर करत, पालखी मार्गावरील वाहतुकीत २० जून रोजी सकाळी ३ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांची वाहने वगळता सर्वसामान्य वाहने बंद राहतील.
वाहतूक बंद कालावधी: २० जून रोजी पहाटे ३ ते सायंकाळी ८ वा. पर्यंत
पर्यायी मार्ग – ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी:
बोपखेल फाटा/विश्रांतवाडी ते कळस फाटा: – धानोरी रोड व अंतर्गत रस्त्यांचा वापर
चंद्रमा चौक जाणारे मार्ग: – तारकेश्वर चौक / पर्णकुटी चौक मार्गे – एअरपोर्ट रोड, गुंजन चौक, बंडगार्डन ब्रिजचा वापर
सादलबाबा चौक ते पाटील इस्टेट मार्ग: – महात्मा गांधी रोड व पर्यायी मार्ग
बंद रस्ते – संत तुकाराम महाराज पालखी मार्ग:
रूट: आकुर्डी विठ्ठल मंदिर – चिंचवड – पिंपरी – वल्लभनगर – नाशिक फाटा – फुगेवाडी – दापोडी – हॅरिस ब्रिज – बोपोडी चौक – खडकी रेल्वे स्टेशन – मरिआई गेट चौक – बाकडेवाडी – पाटील इस्टेट चौक – इंजिनिअरिंग कॉलेज चौक
वाहतुकीसाठी विशेष सूचना:
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहने बंद रस्त्यांवर प्रवेश करु शकणार नाहीत.
नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.
वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनानुसारच प्रवास करावा.
पालखी मार्गावर वाहने लावू नयेत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.
नागरिकांनी वेळेआधी मार्ग नियोजन करावे व वाहतूक पोलीस ट्विटर हँडलवर सतत अद्ययावत माहिती तपासावी.
प्रशासनाची विनंती:
पालखी सोहळ्याचा ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा लक्षात घेता नागरिकांनी सहकार्य करावे, शिस्तबद्ध व सुरक्षित वाहतूक राखण्यास मदत करावी. पुणे पोलिस वाहतूक शाखेने सर्व नियोजन पूर्ण केले असून कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी अधिकारी सज्ज आहेत.