Home Breaking News ‘ट्रॅव्हल विथ जो’ युट्यूब चॅनलची महिला ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटक!

‘ट्रॅव्हल विथ जो’ युट्यूब चॅनलची महिला ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटक!

126
0

नवी दिल्ली | हरियाणातील हिसार पोलिसांनी एक मोठी गुप्तचर कारवाई करत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा या महिला युट्यूबरला अटक केली आहे. ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे युट्यूब चॅनल चालवणाऱ्या ज्योतीवर भारताच्या लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा गंभीर आरोप आहे.
याच प्रकरणात आणखी ५ संशयितांना पंजाब व हरियाणामधून अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे.


युट्यूब शूटिंगच्या निमित्ताने हेरगिरीचा मार्ग

ज्योती मल्होत्रा ही एक लोकप्रिय प्रवासविषयक युट्यूबर असून २०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये ट्रॅव्हल ब्लॉग शूटिंगसाठी गेली होती. या काळातच तिने पाकिस्तान उच्चायुक्तालयाला भेट दिली आणि तिथे दानिश उर्फ अहसान-उर-रहीम या पाकिस्तानी अधिकाऱ्याशी तिची ओळख झाली. प्रारंभी संवाद व नंतर वैयक्तिक भेटी वाढत गेल्या आणि पुढे ज्योती पाकिस्तानच्या ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली.

 ISI कडून भारतविरोधी माहिती मागवली

दानिशने तिचा वापर करून भारताची लष्करी व गुप्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. ज्योतीने मिळवलेली माहिती ईमेल, एनक्रिप्टेड चॅट अ‍ॅप्स व क्लाऊड स्टोरेजद्वारे पाकिस्तानला पोहोचवली गेली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या महत्त्वाच्या लष्करी ऑपरेशनची माहिती सुद्धा लीक केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

पैशांचा आमिष आणि व्हिसा जाळं

दानिशने आर्थिक मदत, व्हिसा व फॉलोअर्स वाढवण्याच्या आमिषाने अनेक भारतीयांना आपल्या जाळ्यात ओढले. पोलिसांनी सांगितले की, ज्योतीसोबत अटक करण्यात आलेले इतर पाचजण देखील त्याच्या प्रभावाखाली काम करत होते.

 केंद्र सरकारचे तत्काळ पाऊल

प्रकरण उघडकीस येताच भारत सरकारने पाकिस्तान उच्चायोगातील अधिकारी दानिश याला २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश दिले.
ही घटना भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि गुप्तचर विभाग सक्रिय झाले आहेत.

 पोलिसांचे वक्तव्य

हिसार पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “पाकिस्तानच्या ISI ची भारतातील माहिती संकलन यंत्रणा अधिक सक्रिय होत आहे. ज्योतीसारख्या सामान्य वाटणाऱ्या लोकांच्या माध्यमातून देशविरोधी कारवाया सुरू होतात, यावर सजग राहणे आवश्यक आहे.”

 सोशल मीडियाद्वारे देशद्रोह!

हे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या गुप्त युद्धाचे उदाहरण आहे. ‘ट्रॅव्हल विथ जो’ सारख्या निष्पाप वाटणाऱ्या चॅनलच्या आड लपून पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रासाठी काम करणं ही अत्यंत धोकादायक बाब आहे.