Home Breaking News परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅली – ‘बेटी बचाओ, बेटी...

परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅली – ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला मोठा प्रतिसाद!

170
0

पुणे : महिला सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस परिमंडळ ५ तर्फे भव्य महिला पोलीस बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.

११६ दुचाकींचा भव्य ताफा – २३२ महिला पोलिसांचा जोश!

ही भव्य बाईक रॅली ८ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथून सुरू झाली आणि एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे समाप्त झाली. या रॅलीमध्ये २३२ महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी ११६ दुचाकींवर स्वार होत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

सिनेअभिनेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा

या बाईक रॅलीचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते पुष्कर जोग, अभिनेत्री संगिता तरडे आणि प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण अधिक प्रेरणादायी झाले. महिलांनी मोठ्या आत्मविश्वासाने, एकजुटीने आणि जोशपूर्ण पद्धतीने ही रॅली पूर्ण केली.

पोलीस दलातील महिलांची नवी ओळख – सशक्त, सक्षम आणि प्रेरणादायी!

पोलिसदलातील महिला अधिकारी आणि अंमलदार केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत नाहीत, तर त्या समाजात महिलांसाठी एक प्रेरणास्थान ठरत आहेत. महिला सबलीकरण, शिक्षण आणि सुरक्षितता यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम गरजेचे आहेत.

डॉ. राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य आयोजन

हा संपूर्ण उपक्रम परिमंडळ ५ चे पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. परिमंडळ ५ मधील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या उपक्रमात आपली जबाबदारी पार पाडली आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश दिला.

महिला दिनाचा अभिमानास्पद उत्सव!

या भव्य रॅलीने पुणे शहरात महिला सबलीकरणाचा नवा अध्याय लिहिला आहे. महिला फक्त घर आणि कुटुंबासाठीच मर्यादित नाहीत, त्या आता सर्वच क्षेत्रांमध्ये सक्षमपणे आपली छाप पाडत आहेत, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.