पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मोठी कारवाई करत चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम तसेच महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर असा एकूण ₹३,७८,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने करण्यात आली.
पहिला गुन्हा : ट्रॅक्टर चोरीचा मोठा प्रकार उघडकीस
काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ०८/२०२५ भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी (वय २९, रा. आंबेगाव बु., कात्रज, पुणे) यांचा ₹३,५०,०००/- किंमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता.
या घटनेच्या तपासादरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी किरण शामराव पवार (वय २७, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी, पुणे) याची ओळख पटवण्यात आली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी चोरीला गेलेला ट्रॅक्टर हस्तगत केला.
दुसरा गुन्हा : घरफोडी करून दागिने, मोबाईल आणि रोख लंपास
दुसऱ्या घटनेत काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १३/२०२५ भा.दं.वि. कलम ३३१ (१) ३०५ अन्वये दाखल गुन्ह्यानुसार, फिर्यादी (वय ४५, रा. ससाणेनगर, हडपसर, पुणे) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने शिरून सोन्याचे दागिने, मोबाईल, आणि रोख रक्कम मिळून ₹२८,५००/- किंमतीचा मुद्देमाल चोरी केला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रवी कमल विश्वकर्मा (वय २०, रा. प्रज्वल सोसायटी, हांडेवाडी चौक, हांडेवाडी, पुणे) यास शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
पोलीस प्रशासनाची उत्कृष्ट कामगिरी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही यशस्वी कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ श्री. राजकुमार शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे आणि पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, प्रविण काळभोर, काटकर, खोकले, तांबोळी, पंधरकर, शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
या घटनांमुळे शहरातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आपल्या मालमत्तेची काळजी घेण्याचे आणि संशयास्पद व्यक्तींविषयी त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.