पुणे : घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणाच्या अधिकृत तपासासाठी सातारा येथे गेलेल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाऐवजी पर्यटन केल्याचा धक्कादायक प्रकार विभागीय चौकशीत उघड झाला आहे. या गंभीर निष्कर्षानंतर महिला पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचाऱ्यांच्या दोन वार्षिक वेतनवाढी संचयी परिणामाशिवाय रोखण्याची शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवडे, पोलीस शिपाई श्रीहरी पाटील आणि कोमल कांबळे यांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी विभागीय चौकशी अहवालाच्या आधारे हा निर्णय घेतला.
चौकशीनुसार, ४ एप्रिल रोजी घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणातील घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकारी तक्रारदार महिलेला घेऊन साताऱ्यात गेले होते. मात्र, स्थानिक पोलिसांशी आवश्यक समन्वय साधण्याऐवजी त्यांनी वाटेत धाब्यावर वेळ घालवला. घटनास्थळी पोहोचल्यानंतरही परिसरातील नागरिक किंवा महत्त्वाच्या साक्षीदारांची चौकशी करण्यात आली नसल्याचे समोर आले.
पंचनामा पूर्ण झाल्यानंतर तातडीने पुण्याकडे परतण्याऐवजी संबंधित अधिकारी कास पठारासह इतर पर्यटनस्थळांना भेट देत फिरल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. तक्रारदार महिलेने तिची आई घरी आजारी असल्याने लवकर पुण्यात परतण्याची वारंवार विनंती केली होती. मात्र, तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही चौकशीत खरा ठरला.
परतीच्या प्रवासात संबंधित अधिकाऱ्यांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जेवणासाठी थांबून उशिरा रात्री पुण्यात आगमन केले. रात्री एकनंतर तक्रारदार महिलेला सुरक्षित घरी पोहोचविण्याऐवजी प्रथम स्वारगेट येथे सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर तिच्या आक्षेपानंतर तिला नारायण पेठ पोलीस चौकीबाहेर सोडण्यात आल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले.
विभागीय चौकशी अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर, शिस्तभंग, निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, असे निरीक्षणही नोंदविण्यात आले. या घटनेमुळे तपास प्रक्रियेत जबाबदारी आणि उत्तरदायित्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.