पिंपरी-चिंचवड | दि. २३ जुलै २०२६ : “स्वच्छ शहर, सक्षम नियोजन आणि पर्यावरणपूरक भविष्य” या ध्येयाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी काळेवाडी येथील एम.एम. कॉलेजजवळील कचरा संकलन केंद्राला प्रत्यक्ष भेट देत तेथील संपूर्ण व्यवस्थेची सखोल पाहणी केली. यावेळी कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि अंतिम विल्हेवाट या सर्व टप्प्यांचा बारकाईने आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
सभापती अभिषेक बारणे यांनी शहरातून दररोज संकलित होणारा ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा केला जात आहे का, त्याचे योग्य वर्गीकरण होत आहे का, तसेच वैज्ञानिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून पर्यावरणपूरक विल्हेवाट लावली जाते का, याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. कचरा व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करून कार्यक्षमता वाढविण्यावरही त्यांनी भर दिला.
यावेळी त्यांनी कचरा संकलन केंद्राचा परिसर, आतील स्वच्छता, दुर्गंधी नियंत्रण, सांडपाणी व्यवस्थापन आणि परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले. कचरा संकलन केंद्रे ही शहराच्या स्वच्छतेचा कणा आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय निकषांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहराची वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारा शहरी विस्तार लक्षात घेता आगामी काळात घनकचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे नमूद करत अभिषेक बारणे यांनी दीर्घकालीन आणि शाश्वत घनकचरा व्यवस्थापन धोरण तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. भविष्यातील गरजांचा विचार करून प्रक्रिया केंद्रांची क्षमता वाढविणे, कचऱ्याचे पुनर्वापर (Recycling), पुनर्निर्मिती (Recovery) आणि स्रोतस्तरावर कचरा वर्गीकरण यावर अधिक भर देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरात ‘झिरो वेस्ट’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृती मोहीम, नागरिकांचा सहभाग, गृहसंकुलांमध्ये कचरा वर्गीकरण आणि पर्यावरणपूरक उपाययोजना अधिक व्यापक स्वरूपात राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कचरा प्रक्रिया केंद्रातील यंत्रसामग्री, दैनंदिन कामकाज, प्रक्रिया क्षमता, मनुष्यबळ आणि भविष्यातील नियोजनाची माहिती सभापतींना दिली. कचरा व्यवस्थापन अधिक पारदर्शक, गतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी विविध सुधारणा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पाहणीमुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून काळेवाडी, थेरगाव आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ, निरोगी आणि प्रदूषणमुक्त वातावरण उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहराला राज्यातील आदर्श आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.