Pune : पुणे शहरात वाढत असलेल्या रिक्षा चोरीच्या घटनांवर मोठी कारवाई करत पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. चोरी केलेल्या रिक्षांना स्क्रॅप झालेल्या रिक्षांचे नंबर लावून त्यांचा वापर करणाऱ्या आरोपीला Kale Padal Police Station यांच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १० लाख ७८ हजार रुपयांच्या ६ रिक्षा हस्तगत केल्या असून शहरातील पाच गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
काळेपडळ पोलीस स्टेशन येथे रिक्षा चोरी प्रकरणी गुन्हा क्रमांक १०८/२०२६ दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस पथकाने परिसरातील तब्बल १०२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरी गेलेली रिक्षा पोखराई धरण, उंद्री परिसरात झाडाखाली पार्क केलेली असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. काही वेळाने रिक्षामध्ये बसलेल्या संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शादाब युसुफ अन्सारी (वय २५) असे सांगितले. तो हडपसरमधील सय्यदनगर परिसरात राहत असल्याचेही समोर आले.
पोलिसांनी पुढील तपास केला असता आरोपी अत्यंत चलाख पद्धतीने रिक्षा चोरी करत असल्याचे उघड झाले. चोरी केलेल्या रिक्षांवर स्क्रॅप झालेल्या जुन्या रिक्षांचे नंबर प्लेट लावून त्या शहरात वापरल्या जात होत्या. त्यामुळे पोलिसांना या रिक्षांचा माग काढणे कठीण जात होते.
आरोपीकडून जप्त केलेल्या रिक्षांच्या तपासातून काळेपडळ, चंदननगर, आंबेगाव, संत तुकारामनगर आणि वानवडी या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण पाच रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपीकडून विविध क्रमांकांच्या सहा रिक्षा जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे १०.७८ लाख रुपये आहे. या कारवाईमुळे शहरातील रिक्षा चोरीच्या मालिकेचा उलगडा झाला असून आणखी काही गुन्ह्यांशी आरोपीचा संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. रिक्षा चालक आणि मालकांमध्ये या कारवाईनंतर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे तसेच पोलीस कर्मचारी प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांनी ही यशस्वी कारवाई केली.
पुणे शहरात वाढणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिमा राबवल्या जात असून नागरिकांनीही आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.