पुणे : पुण्यातील मानाचे गणपती हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहेत. गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य उत्सवाचा’ दर्जा दिल्याने या सणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विविध मानाच्या व ऐतिहासिक गणेश मंडळांना भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले आणि राज्यातील जनतेसाठी प्रार्थना केली.
मुख्यमंत्री म्हणाले, “श्री गणेश सर्वांना सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य देवो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत. समाजात सौहार्द टिकून राहो आणि प्रत्येकाला सुबुद्धी व सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा मिळो हीच प्रार्थना मी श्रींच्या चरणी करतो.”
मानाच्या गणपतींना भेटी
या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या मंडळांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साई गणेश मित्र मंडळ, साने गुरुजी तरुण मंडळ अशा नामवंत मंडळांना भेट देऊन आरती केली. प्रत्येक मंडळात त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत झाले आणि सत्कार करण्यात आला.
नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी भेट
पुणे शहरातील दर्शन यात्रेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट दिली. त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत आणि सत्कार केला. या भेटीमुळे राजकारण आणि कला क्षेत्रातील एकात्म भावाचे दर्शन घडले.
मान्यवरांची उपस्थिती
या दर्शन यात्रेत मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, लोकमान्य टिळक मंडळाचे उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक, दगडूशेठ गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने, साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध मंडळांचे विश्वस्त, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटींमुळे पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वेगळे औचित्य प्राप्त झाले असून, नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या या सहभागाचे हार्दिक स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींना भेट – “सर्वांना सुबुद्धी देवो, सन्मार्गाची प्रेरणा देवो” अशी मुख्यमंत्र्यांची प्रार्थना