Home Breaking News मार्केटयार्ड पोलीसांची मोठी कारवाई! सराईत मोटारसायकल चोर जेरबंद – सुमारे १.६० लाखांचा...

मार्केटयार्ड पोलीसांची मोठी कारवाई! सराईत मोटारसायकल चोर जेरबंद – सुमारे १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

46
0
पुणे : पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक सराईत मोटारसायकल चोरास पकडून तब्बल ₹१,६०,०००/- किंमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे गणेशोत्सव काळात वाढणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन यांनी हद्दीतील गुन्हेगारांवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. यानुसार पेट्रोलिंगदरम्यान पोलीस अंमलदार दत्तात्रय राऊत यांना एक संशयास्पद इसम मोटारसायकलवरून जाताना दिसला. तत्काळ माहिती तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल भापकर यांना कळविण्यात आली.
पोलिसांनी थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता इसमाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी धाडसाने त्यास पकडले. चौकशीत त्याने आपले नाव अनिल गणेश बिरादार (वय २५, रा. महादेव कॉलनी, लोहगाव, पुणे) असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या MH-12-EU-2530 क्रमांकाच्या गाडीबाबत कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने ती गाडी मार्केटयार्ड गेट क्र. १ येथून चोरल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखांत सदर वाहनचोरीचा गुन्हा आधीच दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पुढील कसून चौकशीत आरोपीने आणखी तीन मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे गु.र.नं. १५९/२०२५, १७५/२०२५, १७७/२०२५ अशा तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
या कारवाईत मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-५ श्री. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनिल भापकर, पोलीस अंमलदार दत्ता राऊत, राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, महेश जेधे, किरण जाधव, नितीन झेंडे आणि आशिष यादव यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
 या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये पुणे पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला असून, गणेशोत्सव काळातील सुरक्षिततेसाठी पोलिसांचे प्रयत्न अधिक अधोरेखित झाले आहेत.