पुणे शहराच्या वाघोली भागात “श्री कृष्णा मेटल्स” नावाच्या भांड्याच्या दुकानात दिनांक ३१ जुलै रोजी रात्री चोरी करणाऱ्या चोरट्यांना वाघोली पोलिसांनी केवळ काही तासांत अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे. चोरी झालेल्या रिक्षासह एकूण ५९,०१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपी व एक विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या चोरीची तक्रार दुकानाचे मालक प्रियंकानगरी, वाघोली येथील रहिवासी यांनी दिली होती. अनोळखी तिघांनी मध्यरात्री दुकानाचे शटर उचकाटून रोख रक्कम चोरून रिक्षाने पळ काढला होता. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४), ३२४(४), ३(५) अंतर्गत नोंदवण्यात आला होता.
गोपनीय माहितीच्या आधारे वाघोली पोलिसांनी चतुराईने तपास करत हडपसर परिसरातून आरोपी अनिकेत अविनाश इंगळे (वय २१), साहिल रोशन शेख (वय २०) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल करत चोरीसाठी वापरलेली रिक्षा देखील हडपसर येथून चोरी केल्याचे उघड झाले.
या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा इंगळे, समीर भोरडे, प्रविण केदार, पो. उप.नि. मनोज बागल व त्यांच्या चमूने उल्लेखनीय मेहनत घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
ही कामगिरी वरिष्ठ अधिकारी श्री. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग), श्री. सोमय मुंडे (पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ४), आणि श्रीमती प्रांजली सोनवणे (सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग) यांच्या नेतृत्वात पार पडली.
या प्रकरणामुळे नागरिकांत सुरक्षिततेचा विश्वास वाढला आहे. पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे वाघोली परिसरात चोरीच्या गुन्ह्यांना चाप बसणार आहे.