पुणे – वडगाव शेरी परिसरात कामावर निघालेल्या एका इसमाचे दिवसाढवळ्या अपहरण करून त्याच्या मोबदल्यात २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांनी केवळ २४ तासांत अटक करून पिडीताची सुटका केली आहे. ही धडाकेबाज व वेगवान कारवाई चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास बसला आहे.
घटनाक्रम :
३० जून २०२५ रोजी एक इसम कुबा मस्जिदजवळून वडगाव शेरी येथे कामावर जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केले. नंतर आरोपींनी त्याच्या कुटुंबीयांना फोन करून २ लाख रुपयांची खंडणी मागितली.
घटनेनंतर पीडित इसमाच्या पत्नीने तत्काळ चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गु.र.नं. २४६/२०२५, भादंवि कलम १४०(३) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
तपासाची दिशा आणि पोलिसांची तत्परता :
तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन व तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून आरोपींचा मागोवा घेतला.
यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अजय असवले, अंमलदार शिंदे, लहाने, हसन मुलाणी यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात राजेवाडी गावात छापा टाकून खालील आरोपींना अटक केली –
गौतम केरूजी पोटभरे (३७ वर्षे)
अभिजीत वसंत पोटभरे (२७ वर्षे)
शुभम वसुदेव मायकर (२५ वर्षे)
पोलिसांनी या आरोपींच्या ताब्यातून अपहरण करण्यात आलेल्या इसमाची सुखरूप सुटका करून गुन्हा २४ तासांत उघडकीस आणला आहे.
वरिष्ठांचा मार्गदर्शन व प्रशंसा :
ही अत्यंत संवेदनशील आणि गुन्हेगारीत गंभीर समजली जाणारी घटना मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ – श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या हाताळण्यात आली.
पोलीस प्रशासनाच्या वेळीच केलेल्या तात्काळ कारवाईमुळे एक संभाव्य गंभीर संकट टळले असून नागरिकांत समाधान आणि पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.










