Home Breaking News पुण्यात भीषण दुर्घटना! कॅम्प परिसरात स्लॅब कोसळला; तरुण मजुराचा मृत्यू, चौघेजण गंभीर...

पुण्यात भीषण दुर्घटना! कॅम्प परिसरात स्लॅब कोसळला; तरुण मजुराचा मृत्यू, चौघेजण गंभीर जखमी – बिल्डर व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

82
0

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. साचापीर स्ट्रीटवरील ओयसिस हॉटेल शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामात स्लॅबचा भाग कोसळून एक तरुण मजूर ठार झाला असून, चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली असून, बिल्डर व संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी होत आहे.

 स्लॅब कोसळताना सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष!

या घटनेत बिल्डिंग क्रमांक ४९५/४९६ येथे स्लॅबचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. यावेळी कामावर असलेले कामगार कोणतेही सुरक्षा साहित्य न वापरताच काम करत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. सुरक्षेच्या नियमांचे तीनतेरा वाजले असतानाही कोणतीही खबरदारी न घेता काम सुरू होते.

 मृत आणि जखमी मजुरांची ओळख पटविण्याचे काम सुरू

सध्या जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. घटनेच्या ठिकाणी अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले.

 दोषींवर कारवाईची मागणी

या घटनेनंतर परिसरातील रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांनी कॅम्प पोलिस स्टेशनवर धडक देत, बिल्डर राणावत आणि मेहता, तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचे प्राण गेले, तर अन्य चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 बांधकाम क्षेत्रातील ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर

पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक अपघातांची मालिका पाहायला मिळत आहे. बांधकाम क्षेत्रात नियमबाह्य कामे, ठेकेदारांचा हलगर्जीपणा, आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे मजुरांचे प्राण धोक्यात येत आहेत. पुणे महानगरपालिकेपासून ते कॅन्टोन्मेंट बोर्डपर्यंत कोणताही विभाग जबाबदारी स्वीकारायला तयार नाही, अशी लोकांची भावना आहे.