सांगली | संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या गर्भवती स्व. ऋतुजा सुकुमार राजगे आत्महत्या प्रकरणावर आता सामाजिक आणि राजकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भोसरीचे आमदार महेश लांडगे दादा यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “भगिनी ऋतुजाला धर्मांतरासाठी छळलं गेलं, हा केवळ कौटुंबिक मुद्दा नाही, तर हा आमच्या संस्कृतीवर घाला आहे. या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”
घटनेचा भीषण तपशील –
सांगलीतील सात महिन्यांची गर्भवती ऋतुजा राजगे यांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जात होतं. मात्र, ऋतुजा हिंदू धर्माशी निष्ठावान होती. त्यामुळे या दबावाखाली आणि छळास कंटाळून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेने धर्म, स्त्रीसुरक्षा आणि मानवी हक्क या सर्वच पातळ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केलं आहे. तिच्या पोटी सात महिन्यांचं जीवित बाळही होतं, त्यामुळे ही आत्महत्या नसून ‘दुहेरी हत्या’ आहे, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.
महेश दादांचा थेट इशारा –
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, “आमच्या भगिनीला फक्त तिच्या धर्माशी निष्ठा राखल्याबद्दल मृत्यू पत्करावा लागला, हे आमच्या साऱ्या समाजासाठी काळजावर घाव आहे. अशा प्रकारचे प्रकार जर थांबवायचे असतील, तर यामागच्या दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही राज्य सरकारकडे आणि पोलीस प्रशासनाकडे यासाठी ठामपणे पाठपुरावा करू.”
सामाजिक माध्यमांवर संतापाचा उद्रेक –
ऋतुजाच्या आत्महत्येच्या बातमीनंतर, #JusticeForRutuja #RutujaRajge हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. अनेक महिला संघटना, हिंदू संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, धर्माच्या नावाने महिलांचा छळ सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
आतापर्यंत काय कारवाई?
पोलिसांनी या प्रकरणी ऋतुजाच्या सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील चौकशी सुरू आहे. मात्र, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
आता वेळ आली आहे की, अशा क्रूर मानसिकतेला आणि धर्माच्या नावाने छळ करणाऱ्यांना कठोर शासन करून समाजात एक स्पष्ट संदेश द्यावा – की महिलांचा आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अपमान सहन केला जाणार नाही.