पुणे, ३१ मे २०२५ – अशिक्षित व वृद्ध इसमाला कोर्टाच्या नावाखाली खोट्या अफवा पसरवत तब्बल ५.९४ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका महिला तोतया वकिलाला लोणी काळभोर पोलिसांनी रंगेहात पकडले. या सापळा कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कौशल्यपूर्ण कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेचा तपशील:
स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) या महिलेने दहिगाव माळी गल्ली, ता. शेवगाव, जि. अहमदनगर येथील ६३ वर्षीय अशिक्षित व वृद्ध इसमास स्वतःला वकील असल्याचे भासवून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेतला. सुनेपासून सोडचिठ्ठी करून देण्याचे आमिष दाखवून, वेळोवेळी ऑनलाईन व रोख स्वरूपात एकूण ५,९४,०६०/- रुपये उकळले.
या महिलेने फसवणुकीचे प्रमाण इतके वाढवले की, तिने फिर्यादीस सांगितले की, त्यांच्याविरुद्ध बलात्कार व मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल झालेला असून, महिला आयोगाकडे तक्रारही दाखल झाली आहे. या गुन्ह्यांतून वाचवण्यासाठी पोलिस व कोर्ट कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, अन्यथा अटक होईल, असे खोटे सांगून मानसिक दडपण निर्माण करत खंडणी घेतली.
सापळा रचून रंगेहात अटक:
फिर्यादीने ही हकीकत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्वरित यावर कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक तयार करण्यात आले.
दि. २८ मे रोजी लोणी काळभोर गावातील कार्यालयात सापळा रचण्यात आला. फिर्यादी व्यक्तीकडून स्नेहल कांबळे ही १५,००० रुपये रोख स्वरूपात स्वीकारताना महिला पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी रंगेहात अटक केली. या वेळी पैसे मोजताना व अधिक रकमेची मागणी करतानाचा व्हिडीओ पुरावा म्हणून पोलिसांनी शुट केला.
कायदेशीर कारवाई व अटक:
या घटनेवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २३२/२०२५ अंतर्गत भारतीय दंड विधान कलम ३०८(२)(३), ३१८(४), ३१९(१)(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून स्नेहल कांबळे हिला अटक करण्यात आली आहे.
संपूर्ण पथकाची यशस्वी कामगिरी:
या सर्जनशील व यशस्वी कारवाईसाठी पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे (परिमंडळ ५) व सहायक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोउनि रत्नदिप बिराजदार, महिला पोउनि पूजा माळी, तसेच पोलीस अंमलदार ज्योती नवले, मंगेश नानापुरे, धुमाळ, जोजारे, कुंभार आदींचे विशेष योगदान आहे.
घटनेवर प्रतिक्रिया:
या प्रकारामुळे अशिक्षित, वृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींबाबत जनजागृती आणि कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणखी काही संभाव्य बळी वाचले असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे.