Home Breaking News पिंचीच्या मंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परंपरा, एकजूट आणि स्त्रीशक्तीचा भव्य उत्सव!

पिंचीच्या मंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; परंपरा, एकजूट आणि स्त्रीशक्तीचा भव्य उत्सव!

58
0
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील महिलांसाठी एक खास आणि संस्मरणीय ठरलेला ‘पिंची’ समूहाचा मंगळागौर व नागपंचमी स्नेहमेळावा पारंपरिक उत्साहात आणि महिलांच्या उस्फूर्त सहभागात नुकताच पार पडला. समाजमाध्यमांपासून परिसरातील मैदानांपर्यंत या कार्यक्रमाची रंगत सर्वत्र पाहायला मिळाली. महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक जतन आणि आपुलकीने भरलेल्या या सोहळ्यात हजारो महिलांनी सहभाग घेत महिलांचा जल्लोष अनुभवला.
या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती मा. नीलम गोऱ्हे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या व्यतिरिक्त अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा आरती राव, मसकली संस्थेच्या श्रद्धा सावंत, रॉयल तष्टच्या निकिता माने आणि स्मिता व्यास यांचाही उपस्थितीत सहभाग लाभला.
कार्यक्रमाचे आयोजन ‘पिंची’च्या संस्थापक पूनम परदेशी यांच्या संकल्पनेतून साकारले गेले. पारंपरिक फुगड्या, झिम्मा, उखाणे, लोकनृत्य, गाणी आणि महिलांच्या चविष्ट खाद्यपदार्थांनी सजलेला हा कार्यक्रम हरवत चाललेल्या मंगळागौरीच्या परंपरेला नवसंजीवनी देणारा ठरला. महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या, गजरे, हिरव्या बांगड्या आणि दागदागिने परिधान करत कार्यक्रमाला पारंपरिक साज चढवला.
या कार्यक्रमात बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “स्त्रीशक्ती, आपुलकी आणि परंपरांचा सन्मान या स्नेहमेळाव्यातून प्रकर्षाने दिसून आला आहे. ‘पिंची’च्या माध्यमातून पारंपरिक खेळांना मिळालेला प्रतिसाद ही आधुनिक काळात संस्कृती जपण्याची एक सुंदर उदाहरण ठरली आहे.”
नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत सांगितले, “अशा उपक्रमांमधून महिलांची एकजूट, संस्कृतीवरील प्रेम आणि सामाजिक बांधिलकी ठळकपणे समोर येते. ‘पिंची’ टीम आणि पूनम परदेशी यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायक आहे.”
सुमारे ३०,००० महिलांचा सहभाग असलेल्या ‘पिंची’ समूहाने पुन्हा एकदा सांस्कृतिक आणि सामाजिक जागृतीसाठी आपली भक्कम उपस्थिती दाखवली आहे. या उपक्रमामुळे महिलांना एकत्र येण्याचे, संवाद साधण्याचे आणि परंपरा जपण्याचे व्यासपीठ मिळाले आहे.